loading...

चालू घडामोडी २७ जून २०१८

loading...
भारत आज पहिला टी-२0 सामना :
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱ्याची सुरुवात उद्या येथे आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजयाने करण्याच्या निर्धाराने करील.

या सामन्याद्वारे भारतीय संघ इंग्लंड दौºयाचीदेखील तयारी करील. आयर्लंडच्या छोट्या मालिकेनंतर भारत इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ जबरदस्त कामगिरी करीत असून, त्यांनी एकदिवसीय मालिकेत आॅस्ट्रेलियाचा ५-० असा सफाया केला. त्यांचे जवळपास सर्वच खेळाडू चांगल्या लयीत आहेत.


संघाच्या सूत्रांनुसार सरावादरम्यान खेळाडूंना तीन गटांत विभागण्यात आले होते. आयर्लंडविरुद्धच्या लढतीसाठी केएल राहुलची निवड अंतिम अकरा जणांत पक्की मानली जात आहे. मधल्या फळीसाठी सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि मनीष पांडे यांच्यात चुरस असेल. सुरेश रैनाचा उपयोग सहावा गोलंदाज म्हणून केला जाऊ शकतो.

आयर्लंडसाठी कर्णधार गॅरी विल्सन, माजी कर्णधार विल्यम पोर्टरफिल्ड आणि अष्टपैलू केव्हिन ओ’ब्रायन यांना भारतीय संघाविरुद्ध टी-२० खेळण्याचा अनुभव आहे. दरम्यान, पंजाबात जन्म झालेल्या आयर्लंडच्या ३१ वर्षीय आॅफस्पिनर सिमरनजितसिंह याच्याकडेही सर्वांचे लक्ष असेल. सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल.

जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर तयार :
वैज्ञानिकांनी जगातील सर्वात छोटा कॉम्प्युटर विकसित केल्याचा दावा केला आहे. हा कॉम्प्युटर फक्त ०.३ मिलीमीटर एवढा आहे आणि कॅन्सरचा शोध घेणे आणि त्यावर उपचारांसाठी नवे दरवाजे खुले करण्यासाठी हा मदत करु शकतो.

नव्या कॉम्प्युटर उपकरणात रॅम आणि फोटो व्होल्टिक्सशिवाय प्रोसेसर अणि वायरलेस ट्रान्समीटर आणि रिसिव्हर आहेत. दृश्य प्रकाशाच्या साहाय्याने ते डेटा प्राप्त करतात. यात अधिक प्रकाश सहन करण्याची क्षमताही आहे. कमी विजेवरही हा कॉम्प्युटर चांगल्या प्रकारे चालतो. अध्ययनातून असे दिसून आले आहे की, ट्यूमर सामान्य उतीपेक्षा जास्त गरम होतात. या कॉम्प्युटरच्या साह्याने कॅन्सर उपचारासाठी मदत होऊ शकते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ‘ओव्हरटाइम’ बंद होणार :
केंद्र सरकारने आपल्या सर्व मंत्रालयांमधील व दुय्यम कार्यालयांमधील कर्मचाºयांना यापुढे जादा कामाचा भत्ता (ओव्हरटाइम अलाउन्स-ओटी) न देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कार्यालयातील स्थायी यंत्रणा कार्यत ठेवण्यासाठी लागणारे ‘आॅपरेशनल’ कर्मचारी व ज्यांना कायद्यानुसार ‘ओटी’ देणे बंधनकारक आहे, असे औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी मात्र याला अपवाद असतील.

या निर्णयानंतरही ज्यांना ‘ओटी’ लागू राहील, अशा कर्मचाºयांची यादी प्रत्येक मंत्रालयाने पूर्ण समर्थन करणाºया कारणांसह तयार करायची आहे. शिवाय ‘ओटी’ ची सांगड संबंधित कर्मचाºयाच्या ‘बायोमेट्रिक’ हजेरीशी घालण्याचे व जादा कामाचा भत्ता नव्या वेतनानुसार न देता १९९१ मध्ये ठरलेल्या दरानेच देणयचेही सरकारने ठरविले आहे.

सातव्या वेतन आयोगाने ‘ओटी’ बंद करण्याची शिफारस केली होती.
कर्मचाºयांचे उत्तरोत्तर वाढत गेलेले पगार पाहता ही शिफारस स्वीकारावी, असे खर्च विभागाने सूचविल्यानंतर कार्मिक विभागाने तशा निर्णयाचा कार्यालयीन आदेश सर्व मंत्रालयांना पाठविला आहे.

FIFA World Cup सामन्यांचे शतक पूर्ण फर्नांडो मुस्लेरा :
यजमान म्हणजेच रशिया संघाचा ३-० ने धुव्वा उडवत उरुग्वे संघाने यंदाच्या विश्वचषकातील विजयाची हॅट्ट्रिक साधली. या संघाने आपल्या कामगिरीने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मानांकनात हा संघ रशियापेक्षा वरचढ होता, हे मान्य असले तरी या संघातील खेळाडूंनी ज्या पद्धतीने प्रदर्शन केले त्यावरून विजयाचे हकदार त्यांनाच म्हणावे लागेल. प्रशिक्षक ऑस्कर तबारेझ यांनी संघाची चांगली बांधणी केली. त्यात सर्वात मोठा विश्वासू खेळाडू आहे तो म्हणजे त्यांचा गोलरक्षक. या गोलरक्षकाने उरुग्वेकडून १०० सामने खेळण्याचा विक्रम नोंदवला. फर्नांडो मुस्लेरा असे या गोलरक्षकाचे नाव. अशी कामगिरी करणारा हा ३२ वर्षीय या खेळाडू उरुग्वेचा सातवा गोलरक्षक आहे. विश्वचषकातील हा त्याचा १४ वा सामना होता. यापूर्वी २०१० मध्ये तो ७ सामने खेळला. २०१४ मध्ये चार आणि यंदाच्या विश्वचषकात ३ सामने खेळला आहे.

यंदाच्या विश्वचषकात उरुग्वेसाठी त्याची कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे. प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या संधी मोडून काढण्यात या खेळाडूने कसलीही कसर सोडलेली नाही. ११ जून २०१० रोजी त्याने विश्वचषकात पदार्पण केले होते. फ्रान्सविरुद्ध त्याच पहिला सामना होता. फ्रान्सला त्यांनी गोलशून्य अशा बरोबरीवर रोखले होते. विश्वचषकात दीर्घकाळ आपला गोलपोस्ट सुरक्षित ठेवणारा गोलरक्षक म्हणून त्याचे नाव आघाडीवर आहे. विश्वचषकात आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत पोहचवणारा फर्नांडो संघाचा मुख्य खेळाडू आहे.

नव्या भारतात गुंतवणुकीचे पंतप्रधानांचे आवाहन :
आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेकडून सहकार्याची अपेक्षा गेल्या चार वर्षांत आपल्या सरकारच्या कालावधीतील दमदार आर्थिक प्रवासाचा उल्लेख करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी, आरोग्य तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर भर असलेल्या ‘नव्या भारता’त गुंतवणूक करण्याचे आवाहन आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या परिषदेला उपस्थित प्रतिनिधींना केले.

कृषी, शेती, ठिबक सिंचन तंत्रज्ञान, माल वाहतूक, भांडारगृहे तसेच आरोग्यविषयक सुविधा व योजना आणि माहिती-तंत्रज्ञानाशी निगडित क्षेत्रांमध्ये गेल्या काही कालावधीपासून सरकार भर देत आहे. अस्सल नवा भारत हाच असून या क्षेत्रात गुंतवणुकीची आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना संधी आहे, असे पंतप्रधानांनी भाषणात नमूद केले.

आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षिक सभेला पंतप्रधान मोदी यांनी मुंबईत मंगळवारी संबोधित केले. केंद्रीय अर्थ व्यवहार विभाग तसेच आशियाई पायाभूत गुंतवणूक बँक (एआयआयबी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेला बँकेचे अध्यक्ष जिन लिकन यांनीही मार्गदर्शन केले.

ज्ञानाधारित अर्थव्यवस्था, सर्वागीण विकास यावर आधारलेली नवी भारतीय अर्थव्यवस्थेतून  सर्वासाठी संधी असल्याचे नमूद करत मोदी यांनी अर्थसंपन्नच्या दृष्टीने जागतिक स्तरावर भारत हा एक ठळक बिंदू असल्याचा गौरव केला.

सुमारे २.६ लाख कोटी डॉलरची भारताची अर्थव्यवस्था ही जगातील सातवी मोठी अर्थव्यवस्था असून क्रयशक्तीत या देशाचा क्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा लागतो, असे स्पष्ट करत मोदी यांनी मार्च २०१९ अखेर देशाचा विकास दर ७.४ टक्के असेल, असा विश्वास व्यक्त केला.

दिनविशेष

काही महत्वाच्या घटना:
१९९६ अर्थतज्ञ द. रा. पेंडसे यांना ’महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’चा ’चिंतामणराव देशमुख पुरस्कार’ जाहीर
१९९१ युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.
१९७७ जिबुटी (Dijbouti) ला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
१९५४ अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युतकेंद्र (क्षमता: ५००० किलो वॅट) रशियातील मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.
१९५० अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.


जन्म :
१९३९ राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)
१९१७ खंडेराव मोरेश्वर ऊर्फ ’खंडू’ रांगणेकर – आक्रमक डावखुरे फलंदाज (मृत्यू: ११ आक्टोबर १९८४)
१८८० हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका (मृत्यू: १ जून १९६८)
१८७५ दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ ’कवी दत्त’ (मृत्यू: १३ मार्च १८९९)
१८६४ शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)
१८३८ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)
१५५० चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: ३० मे १५७४)
१४६२ लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

मृत्यू :
२००८ फील्ड मार्शल सॅम माणेकशा (जन्म: ३ एप्रिल १९१४)
२००० द. न. गोखले – शिक्षणतज्ञ व चरित्रकार (जन्म: ? ? ????)
१९९८ होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)
१९९६ अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (जन्म: ५ एप्रिल १९०९)
१८३९ महाराजा रणजितसिंग – शिख साम्राज्याचे संस्थापक (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)
१७०८ धनाजी जाधव – मराठा साम्राज्यातील सेनापती (जन्म: ? ? १६५०)

चालू घडामोडींच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटर वर आणि जी प्लस फाॅलो करा...