अलंकारांचे प्रकार

उपमा
उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
  • दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो.
  • या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. ‘एक वस्तु दुसर्‍या वस्तूसारखी आहे’ असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो.
उदा०
सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे
उत्प्रेक्षा
उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
  • उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो.
(जणू,गमे,वाटे,भासे,की)
उदा०
ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू.
सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू.
अत्रीच्या आश्रमी
नेले मज वाटे
माहेरची वाटे
खरेखुरे
अपन्हुती
(अपन्हुती म्हणजे लपविणे/झाकणे)
अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
*”उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा ‘अपन्हुती’ हा अलंकार होतो.”
उदा.-
 हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल |
 हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ ||
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात ‘कमळातल्या पाकळ्या’ आणि ‘शरदिचा चंद्रमा’ या उपमानांनी अनुक्रमे ‘नयन’ आणि ‘वदन’ या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे ‘अपन्हुती’ अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
  1. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले |
  1. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे |
  1. आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी
    ती हाक येई कानी मज होय शोक भारी
    नोहेच हाक माते मारी कुणी कुठारी
अन्योक्ती
अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
  • दुसर्‍यास उद्देशून केलेली उक्ती.
  • ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्‍याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात.
येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक
हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक
कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक
पर्यायोक्ती
  • एखादी गोष्ट आडवळणाने सांगणे.
त्याचे वडील ‘सरकारी पाहुणचार’ घेत आहेत. ( तुरुंगात आहेत)
विरोधाभास
  • एखाद्या विधानात वरवर विरोध दिसतो पण वास्तवात तसा नसतो.
जरी आंधळी मी तुला पाहते
सर्वच बोलू लागले की कोणी ऐकत नाही
व्यतिरेक
(विशेष स्वरूपाचा अतिरेक)
व्यतिरेक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.*”जेव्हा कोणत्याही काव्यात वा वाक्यात उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ दाखविले जाते तेव्हा ‘व्यतिरेक’ अलंकार होतो.”
ːउदा.- ‘अमृताहुनि गोड नाम तुझे देवा’
स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात परमेश्वराचे नाव हे उपमेय गोडीच्या बाबतीत अमृत या उपमानापेक्षाही वरचढ आहे (श्रेष्ठ आहे ) असे वर्णन केलेले असल्यामुळे इथे ‘व्यतिरेक’ अलंकार झालेला आहे.
ːअन्य उदाहरणे-
  1. कामधेनुच्या दुग्धाहुनही ओज हिचे बलवान
  1. तू माउलीहून मयाळ | चंद्राहूनि शीतळ |
    पाणियाहुनि पातळ | कल्लोळ प्रेमाचा ||
  1. सावळा ग रामचंद्र
    रत्नमंचकी झोपतो
    त्याला पाहून लाजून
    चंद्र आभाळी लोपतो
रूपक
रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
  • उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.
उदा:
बाई काय सांगो
स्वामीची ती दृष्टी
अमृताची वृष्टी
मज होय
ऊठ पुरुषोत्तमा
वाट पाहे रमा
दावि मुखचंद्रमा
सकळिकांसी
अतिशयोक्ती
अतिशयोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
अलंकारात प्रत्यक्षात असणारी कल्पना ही फारच फुगवून सांगितलेली असते तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उपमा, उत्प्रेक्षा, रुपक, व्यतिरेक ह्या अलंकारात अतिशयोक्ती असतेच पण कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करुन सांगितलेली असते तेव्हा हा अलंकार होतो.
उदा: जो अंबरी उफळता खुर लागलाहे तो चंद्रमा निज तनूवरि डाग लाहे
काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर
अनन्वय
अनन्वय हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
  • उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते.
उदा: आहे ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी
या दानासी या दानाहुन अन्य नसे उपमान
भ्रान्तिमान
  • उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होणे.
भृंगे विराजित नवी अरविंदपत्रे
पाहूनि मानूनी तिचीच विशाल नेत्रे
घालीन अंजन अशा मतिने तटाकी
कांते वृथा उतरलो, भिजलो विलोकी
भुंग्यांनी सुशोभित झालेली कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच आहेत असे समजून तिच्या डोळ्यात अंजन घालावयास निघालेला नलराजा पुढे सरसावला आणि पाण्यामुळे भिजला.
ससंदेह
  • उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा संदेह निर्माण होणे.भ्रान्तिमानात हा भ्रम निश्चित असतो.
कोणता मानू चंद्रमा ? भूवरीचा की नभीचा?
चंद्र कोणता? वदन कोणते?
शशांक मुख की मुख शशांक ते?
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखद संभ्रमा- मानू चंद्रमा कोणता?
दृष्टान्त
  • एखादा विषय पटवून सांगताना दाखला देणे.
उदा:
लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार
अर्थान्तरन्यास
अर्थान्तरन्यास हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
  • एखाद्या विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे देणे आणि सिद्धान्त मांडणे.
(अर्थान्तर- दुसरा अर्थ, न्यास- शेजारी ठेवणे )
तदितर खग भेणे वेगळाले पळाले
उपवन-जल-केली जे कराया मिळाले
स्वजन गवसला जो त्याजपाशी नसे तो
कठिण समय येता कोण कामास येतो?
स्वभावोक्ती
  • एखाद्या व्यक्त्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वाभाविक स्थितीचे, हालचालीचे यथार्थ पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन.
उदा: गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी
म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधीन माडी
मिचकावुनी मग उजवा डोळा आणि उडवूनी डावी भिवई
भिरकावुनि ती तशिच द्यायचा लकेर बेचव जैसा गवई
अनुप्रास
  • एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.[१]
उदा: (ल)
गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले
शितलतनु चपलचरण अनिलगण निघाले
रजनीतल,ताम्रनील
स्थिर पल जल पल सलील
हिरव्या तटि नावांचा कृष्ण मेळ खेळे.
पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी (प)
गळ्यामधे गरिबच्या गाजे संतांची वाणी (ग)
चेतनगुणोक्ती
(चेतनाचे गुण सांगणारी उक्ती)
चेतनगुणोक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.
*”जेव्हा एखादी अचेतन (निर्जीव) वस्तू सचेतन (सजीव) आहे असे मानून ती सजीव प्राण्याप्रमाणे, माणसाप्रमाणे वागते असे वर्णन केलेले असते तेव्हा ‘चेतनगुणोक्ती’ हा अलंकार होतो.”
ːउदा.- डोकी अलगद घरे उचलती |
काळोखाच्या उशीवरूनी ||
स्पष्टीकरण- काळोखाच्या उशीवरून (निर्जीव) घरे आपली डोकी उचलतात म्हणजे झोपेतून जागी होतात. येथे घर हा निर्जीव घटक माणसाप्रमाणे वर्तन करतो असे वर्णन आल्यामुळे इथे चेतनगुणोक्ती अलंकार होतो.
ːअन्य उदाहरणे-
  1. चाफा बोलेना, चाफा चालेना
    चाफा खंत करी , काही केल्या फुलेना ||[२]
  1. मंगल मंगल गीत म्हणे, अस्फुट रजनी मूकपणे||
  1. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला
    पोते खांद्यावरी सौद्याचे, देईल ज्याचे त्याला
यमक
कवितेच्या चरणात ठरावीक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक अलंकार होतो.
उदा: जाणावा तो ज्ञानी
पूर्ण समाधानी
निःसंदेह मनी
सर्वकाळ
पुष्ययमक
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो
दामयमक
आला वसंत कविकोकिल हाही आला
आलापितो सुचवितो अरुणोदयाला
श्लेष
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्याने जेव्हा शब्दचमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो.
उदा: सूर्य उगवला झाडीत
म्हारिण* रस्ता झाडीत
शिपाइ गोळ्या झाडीत
अन् वाघहि तंगड्या झाडीत
राम गणेश गडकरीकृत हे एक “झाडीत” या शब्दावरील श्लेषाचे उदाहरण
  • जातीयवाचक शब्दाबद्दल क्षमस्व. आहे तसे लिहिले आहे.
शब्दश्लेष
  • वाक्यात दोन अर्थ असणार्‍या शब्दाबद्दल दुसर्‍या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही?
मित्र- सूर्य/सवंगडी
अर्थश्लेष
वाक्यात दोन अर्थ असणार्‍या शब्दाबद्दल दुसर्‍या अर्थाचा शब्द ठेवल्यास श्लेष कायम राहिला तर त्यास अर्थश्लेष म्हणतात अन्यथा त्यास शब्दश्लेष म्हणतात.
उदा: तू मलिन, कुटिल, नीरस जडहि पुनर्भवपणेहि कच साच कच – केस/कच हा हा
सभंग श्लेष
उदा: श्रीकृष्ण नवरा मी नवरी
शिशुपाल नवरा मी न-वरी
कुस्करू नका ही सुमने
जरी वास नसे तीळ यांस, तरी तुम्हांस अर्पिली सु-मने
ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले
औषध नलगे मजला,औषध नल-गे मजला, परिसुनि माता ‘बरे’ म्हणूनी डोले
असंगती
  • कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसर्‍याच ठिकाणी असे वर्णन असते.
कुणि कोडे माझे उकलिल का? कुणी शास्त्री रहस्य कळविल का?
हृदयी तुझ्या सखि, दीप पाजळे, प्रभा मुखावरी माझ्या उजळे
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
सार
  • एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधणे.
काव्यात नाटके रम्य, नाटकांत शकुंतला
त्यामध्ये चवथा अंक, त्यातही चार श्लोक ते
व्याजस्तुती
  • बाह्यतः स्तुती आणि आतून निंदा अथवा ह्याच्या उलट असे वर्णन.
होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आस ती
अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहून कोणती
व्याजोक्ती
(व्याज + उक्ती=खोटे बोलणे)
  • एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून खोटे दुसरेच कारण देणे.
येता क्षण वियोगाचे पाणी नेत्रांमध्ये दिसे
‘डोळ्यात काय गेले हे?’ म्हणूनी नयना पुसे ALANKAR