क्रियापद मराठी व्याकरण

व्याकरणाच्या नियमानुसार क्रियापद म्हणजे भाषेतील क्रियावाचक शब्द. “श्याम खातो” यात खातो हे क्रियापद आहे. त्यातला मूळ धातू खा हा आहे. मराठीतील सर्व धातू ’णे’कारान्त लिहिण्याची पद्धत आहे, त्यामुळे खा हा धातू शब्दकोशात खाणेअसा दाखविला जातो.
असे असले तरी सर्वच क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. उदा० सोने पिवळे असते. त्याला फार आनंद झाला. या वाक्यांतले ’असते’ आणि ’झाला’ ही अनुक्रमे ’असणे’ आणि ’होणे’ या धातूंपासून बनलेली क्रियापदे आहेत. परंतु ही क्रियापदे ’क्रिया’ दाखवीत नाहीत. त्यामुळे ’क्रियापदा’ची वेगळी व्याख्या करणे जरुरीचे आहे. ती करणे तितकेसे सोपे नाही. मात्र क्रियापदाची दोन लक्षणे नक्की आहेत. पहिले क्रियाबोधकत्व आणि दुसरे वाक्यपूरकत्व. वाक्यात क्रियापद म्हणून आलेला शब्द काही तरी विधान करतो, आणि वाक्य पूर्ण करतो.. क्रियापद क्रियेचा बोध करीत असल्याने तो शब्द काळाचाही बोध करतो. आज्ञार्थक आणि संकेतार्थक क्रियापदे काळाबरोबर अर्थाचाही बोध करतात.

मराठीत क्रियापदांचे प्रकार

मराठीत क्रियापदांचे तीन प्रकार आहेत. सकर्मकअकर्मक आणि संयुक्त.

सकर्मक क्रियापदे

 • सकर्मक क्रियापद म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या वाक्यांचे अर्थ पूर्ण होण्यासाठी, अधिक कळण्यासाठी कर्माची गरज असते, ती क्रियापदे.
  • उदा० वाचणे, लिहिणे, पाहणे इ.
म्हणजे “मी वाचले.” यापेक्षा “मी पुस्तक वाचले.” ही अधिक सार्थ आहे.
 • मराठीतील सकर्मक क्रियापदांत लिंगवचनानुसार होणाऱ्या बदलांबद्दलचे नियम [१]
  • उदा० खाणे

वर्तमानकाळ

राम आंबा खातो – राम चिंच खातो – राम बोर खातो
सीता आंबा खाते – सीता चिंच खाते – सीता बोर खाते
पाखरू आंबा खाते – पाखरू चिंच खाते – पाखरू बोर खाते
राम आंबे खातो – राम चिंचा खातो – राम बोरे खातो
सीता आंबे खाते – सीता चिंचा खाते – सीता बोरे खाते
पाखरू आंबे खाते – पाखरू चिंचा खाते – पाखरू बोरे खाते
राम आणि लक्ष्मण आंबा खातात – राम आणि लक्ष्मण चिंच खातात – राम आणि लक्ष्मण बोर खातात
सीता आणि ऊर्मिला आंबा खातात – राम आणि लक्ष्मण चिंच खातात – सीता आणि ऊर्मिला बोर खातात
पाखरे आंबा खातात – पाखरे चिंच खातात – पाखरे बोर खातात
राम आणि लक्ष्मण आंबे खातात – राम आणि लक्ष्मण चिंचा खातात – राम आणि लक्ष्मण बोरे खातात
सीता आणि ऊर्मिला आंबे खातात – राम आणि लक्ष्मण चिंचा खातात – सीता आणि ऊर्मिला बोरे खातात
पाखरे आंबे खातात – पाखरे चिंचा खातात – पाखरे बोरे खातात

भूतकाळ

रामाने आंबा खाल्ला – रामाने चिंच खाल्ली -रामाने बोर खाल्ले
सीतेने आंबा खाल्ला – सीतेने चिंच खाल्ली – सीतेने बोर खाल्ले
पाखराने आंबा खाल्ला – पाखराने चिंच खाल्ली – पाखराने बोर खाल्ले
रामाने आंबे खाल्ले- रामाने चिंचा खाल्ल्या -रामाने बोरे खाल्ली
सीतेने आंबे खाल्ले – सीतेने चिंचा खाल्ल्या – सीतेने बोरे खाल्ली
पाखराने आंबे खाल्ले – पाखराने चिंचा खाल्ल्या – पाखराने बोरे खाल्ली
राम आणि लक्ष्मण ह्यांनी आंबा खाल्ला – राम आणि लक्षमण ह्यांनी चिंच खाल्ली – राम आणि लक्ष्मण ह्यांनी बोर खाल्ले
सीता आणि ऊर्मिला ह्यांनी आंबा खाल्ला – सीता आणि ऊर्मिला ह्यांनी चिंच खाल्ली – सीता आणि ऊर्मिला ह्यांनी बोर खाल्ले
पाखरांनी आंबा खाल्ला – पाखरांनी चिंच खाल्ली – पाखरांनी बोर खाल्ले
राम आणि लक्ष्मण ह्यांनी आंबे खाल्ले – राम आणि लक्षमण ह्यांनी चिंचा खाल्ल्या – राम आणि लक्ष्मण ह्यांनी बोरे खाल्ली
सीता आणि ऊर्मिला ह्यांनी आंबे खाल्ले – सीता आणि ऊर्मिला ह्यांनी चिंचा खाल्ल्या – सीता आणि ऊर्मिला ह्यांनी बोरे खाल्ली
पाखरांनी आंबे खाल्ले – पाखरांनी चिंचा खाल्ल्या – पाखरांनी बोरे खाल्ली.

भविष्यकाळ

राम आंबा खाईल – राम चिंच खाईल – राम बोर खाईल
सीता आंबा खाईल – सीता चिंच खाईल – सीता बोर खाईल
पाखरू आंबा खाईल – पाखरू चिंच खाईल – पाखरू बोर खाईल
राम आंबे खाईल – राम चिंचा खाईल – राम बोरे खाईल
सीता आंबे खाईल – सीता चिंचा खाईल – सीता बोरे खाईल
पाखरू आंबे खाईल – पाखरू चिंचा खाईल – पाखरू बोरे खाईल
राम आणि लक्ष्मण आंबा खातील – राम आणि लक्ष्मण चिंच खातील – राम आणि लक्ष्मण बोर खातील
सीता आणि ऊर्मिला आंबा खातील – सीता आणि ऊर्मिला चिंच खातील – सीता आणि ऊर्मिला बोर खातील
पाखरे आंबा खातील – पाखरे चिंच खातील – पाखरे बोर खातील
राम आणि लक्ष्मण आंबे खातील – राम आणि लक्ष्मण चिंचा खातील – राम आणि लक्ष्मण बोरे खातील
सीता आणि ऊर्मिला आंबे खातील – सीता आणि ऊर्मिला चिंचा खातील – सीता आणि ऊर्मिला बोरे खातील
पाखरे आंबे खातील – पाखरे चिंचा खातील – पाखरे बोरे खातील

इंग्रजीतील पॅसिव्ह व्हॉईस प्रमाणे

आंबा (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ला ( जातो/गेला/जाईल)
चिंच (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ली ( जाते/गेली/जाईल)
बोर (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ले ( जाते/गेले/जाईल)
आंबे (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ले ( जातात/गेले/जातील)
चिंचा (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ल्या ( जातात/गेल्या/जातील)
बोरे (राम/सीता/पाखरू ह्यातल्या एका किंवा अनेकांकडून) खाल्ली ( जातात/गेली/जातील)

अकर्मक क्रियापदे

 • अकर्मक क्रियापद म्हणजे जी क्रियापदे वापरलेल्या वाक्यांचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज नसते, अशी क्रियापदे.
  • उदा० बसणे, उडणे, धावणे इ.
म्हणजे “पक्षी उडाला” हे अर्थपूर्ण वाक्य आहे. अशी आणखी वाक्ये : कोळसा काळा असतो, देव आहे, तो निजला, तो राजा झाला वगैरे. या सर्व वाक्यांतली क्रियापदे अकर्मक आहेत. ’तो राजा झाला’ या वाक्यातल्या ’होणे’पासून बनलेल्या झाला या क्रियापदाची ’राजा’वर काहीही क्रिया होत नाही.

संयुक्त क्रियापद

 • संयुक्त क्रियापदात दोन किवा अधिक क्रियापदे असतात. पैकी एकाचे धातुसाधित रूप असते.
  • उदा. “तो वाचत बसला.” यात वाचणे आणि बसणे अशी दोन क्रियापदे असली तरी एकाच कृतीचा बोध होतो. म्हणून येथे “वाचत बसला” हे संयुक्त क्रियापद होय. तसेच, तो वाचता वाचता बसला. क्रियापद दाखविणारे हे एकाहून अधिक शब्द सुटेसुटे लिहायचे असतात. उदा० जिंकू या, जाऊ दे, करू पाहतो.

प्रयोग

 • कर्मणी, कर्तरी आणि भावे प्रयोग .

कर्तरी प्रयोग

 • क्रियापद कर्त्याप्रमाणे चालते .
  • उदा० राम पळतो. सीता पळते .

सकर्मक कर्तरी

शबरी बोरे देते. राम बोरे खातो.

अकर्मक कर्तरी

शबरी सुखावते. राम हसतो.

कर्मणी प्रयोग

 • क्रियापद कर्माप्रमाणे चालते.
  • उदा० रामाने आंबा खाल्ला. रामाने कैरी खाल्ली. अशा वाक्यांतील कर्ता तृतीया विभक्तीत असते आणि कर्म प्रथमा विभक्तीत.
 • दोन कर्मे असतील तर प्रथमान्त कर्माप्रमाणे क्रियापद चालते. द्वितीया विभक्तीत असलेल्या कर्माच्या लिग-वचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही.
  • उदा० त्याने तिला पुस्तक दिले. त्याने तिला वही दिली. तिने त्याला पुस्तक दिले. तिने त्याला वही दिली.

सकर्मक भावे प्रयोग

 • कर्त्याचे, कर्माचे, काहीही लिंग-वचन असले तरी क्रियापद बदलत नाही.
  • राजाने शत्रूला मारले. राणीने शत्रूंना मारले. राणीने मुंगीला मारले. राजांनी मुंग्यांना मारले, वगैरे. अशा वाक्यांतील कर्ता तृतीया विभक्तीत आणि कर्म द्वितीया विभक्तीत असते.

अकर्मक भावे प्रयोग

 • कर्त्याच्या लिंगवचनाप्रमाणे क्रियापद बदलत नाही.
  • त्याने जावे. त्यांनी जावे. तिने जावे. वगैरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here