प्रा. पुष्पा भावेंना राजर्षी शाहू पुरस्कार

ज्येष्ठ समाजवादी नेत्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार जाहिर झाला आहे. याबाबतची घोषणा आज राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी केली. दरम्यान, 26 जूनला राजर्षी शाहू जयंतीदिनी पुरस्काराचे वितरण होईल.

मराठीतील एक विचारवंत लेखक आणि प्रभावी वक्तृत्वाबरोबरच त्याला सुसंगत प्रत्यक्ष कृतीची जोड देणाऱ्या प्रा. भावे यांच्या आजवरच्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना पुरस्काराने गौरविले जाईल. मराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यांनी नाटकांविषती आणि एकूण नाट्यसृष्टीविषयी भरपूर लेखन केले आहे. अनेक गाजलेल्या नाटकांची त्यांनी केलेली समीक्षणेही गाजली आहेत. विद्यार्थिदशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी त्यांचा संपर्क होता.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवामुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात महागाईविरोधी आंदोलनामध्ये अहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासमवेत पुष्पाताई या लाटणे मोर्चात हिरिरीने सहभागी झाल्या. मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समिती, स्त्रीवादी चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, डॉ. बाबा आढाव यांच्या असंघटित कामगार चळवळीतही त्या सक्रीय आहेत.

पुरोगामी विचारांची पक्की बैठक, अन्यायाविरोधात लढणाऱ्यांना क्रियाशील पाठिंबा, सामाजिक प्रश्नांची तड लावण्यासाठी आंदोलनातील अग्रभागी राहणाऱ्या प्रा. पुष्पा भावे यांना यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार जाहीर झाला. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने २६ जून रोजी शाहू जयंतीदिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. रोख एक लाख रुपये, स्मृतीचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पुरस्काराची घोषणा केली. मंगळवारी (ता. २६) सायंकाळी सहा वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते व शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. भावे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
ट्रस्टचे विश्वस्त डॉ. जयसिंगराव पवार यांनी भावे यांच्या निवडीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘सामाजिक क्षेत्रात असामान्य कामगिरीबद्दल आणि शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून प्रा. भावे यांची ओळख आहे. समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान यासाठी त्यांची निवड केली आहे. पुरोगामी विचाराच्या मध्यमवर्गीय घरामध्ये जन्मलेल्या पुष्पा भावे यांचे शिक्षण मुंबईतील एल्फिस्टन कॉलेज, पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे झाले. मराठी व संस्कृत विषयांची उच्च पदवी त्यांनी संपादन केली आहे.
मराठी साहित्य, सौंदर्यशास्त्र, नाट्यशास्त्र या क्षेत्रात सैद्धांतिक मांडणारी करणारे कसदार लेखन करत मराठी साहित्यात समीक्षक म्हणून त्यांना आदराचे स्थान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून त्यांनी सार्वजनिक जीवनास प्रारंभ केला. शाहीर अमर शेखांच्या सानिध्यात लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डाव्या विचारांच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. गोवा मुक्ती आंदोलन, दलित पँथर चळवळ, आणीबाणीविरोधी लढा, मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळ, डॉ. बाबा आढावांची एक गाव एक पाणवठा, हमाल पंचायत, देवदासी मुक्ती चळवळ, असंघिटत महिला कामगारांचे लढे, आंदोलन, चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग आहे. आजही त्यांचा सामाजिक चळवळींना सक्रीय पाठिंबा आहे.
राजर्षी शाहू पुरस्काराचे मानकरी
 • भाई माधवराव बागल (१९८४)
 • श्रीमती मेहरुन्निसा दलवाई (१९८५)
 • क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर (१९८६)
 • चित्रपती व्ही. शांताराम (१९८७)
 • शाहीरविशारद पिराजीराव सरनाईक (१९८८)
 • डॉ. बाबा आढाव (१९८९)
 • तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९०)
 • गुरु हनुमान सिंग (१९९१)
 • साथी नानासाहेब गोरे (१९९२)
 • बाबा नेसरीकर (१९९३)
 • चंद्रकांत मांडरे (१९९४)
 • वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज (१९९५)
 • शंकरराव खरात (१९९६), मायावती (१९९७)
 • रयत शिक्षण संस्था, सातारा (१९९८)
 • न्या. पी. बी. सावंत (१९९९)
 • रॅग्लर जयंत नारळीकर (२०००)
 • आशा भोसले (२००१)
 • राजेंद्र सिंह (२००३)
 • जयमाला शिलेदार (२००५)
 • यशवंतराव मोहिते (२००६)
 • प्रा. एन. डी. पाटील (२००७)
 • डॉ. भालचंद्र मुणगेकर (२००८)
 • प्राचार्य शिवाजीराव भोसले (२००९)
 • डॉ. आ. ह. साळुंखे (२०१०)
 • प्राचार्य रा. कृ. कणबरक, बाबूराव धारवाडे (२०११)
 • कॉ. गोविंदराव पानसरे (२०१२)
 • प्राचार्य पी. बी. पाटील (२०१३)
 • हिंदकेसरी गणपतराव आंदळकर (२०१४)
 • भाई वैद्य (२०१५), शरद पवार (२०१६)
 • डॉ. रघुनाथ माशेलकर (२०१७)
 • प्रा. पुष्पा भावें (२०१8)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here