MPSC ची तयारी कशी करावी ?

एम पी एस सी परिक्षेचा अभ्यास योग्य मार्गदर्शन व जिद्दीने करणे फार गरजेचे आहे. त्याच बरोबर परिक्षार्थ्यांच्या अंगी सकारात्मक दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची सखोल तयारी करून स्पर्धेत उतरत आहेत. या विद्यार्थ्यांची संख्या आणि जागेची संख्या यत कमालीची तफावत आहे. यासाठी योग्य तयारीने व जिद्दीने स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरले तर यश यश मिळू शकते.

mpsc study
पूर्वपरीक्षा संपल्यानंतर जर मुख्य परीक्षेत कालावधी कमी असेल तर एवढया कमी कालावधीत या दोन प्रश्नपत्रिकांची तयारी पूर्ण होत नाही, म्हणून आतापासून वेगाने लिहिण्याची तसेच अक्षर सुवाच्च काढून कमीत कमी वेळेत कमीत कमी शब्दांत आपले विचार प्रभावीपणे कसे मांडू शकतो, याचा सराव करावा. काही विद्यार्थ्यांचा असा समज असतो की, या दोन प्रश्नपत्रिकांची विशेष तयारी न करता आपण मुख्य परीक्षेला सहज हे पेपर लिहू शकतो. मात्र हा फाजील आत्मविश्वास ठरू शकतो.सामान्य अध्ययनाच्या पेपरचा अभ्यास करताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. ती म्हणजे पूर्व परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या पेपर 1 चा अभ्यास करताना मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययनाच्या दृष्टीने अभ्यास केल्यास त्याचा लाभ राज्यसेवा पूर्व परीक्षेला तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेला व केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला नक्कीच होतो. पूर्व परीक्षेला व मुख्य परीक्षेत सामान्य अध्ययानाचा पेपर हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा असतो. अभ्यासक्रमातदेखील फारसा फरक नाही.
  • उदा. पूर्व परीक्षेसाठी इतिहास अभ्यासताना भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास पूर्व व मुख्य परीक्षेत सारखाच आहे. त्यामुळे पूर्वपरीक्षेत या घटकाचा अभ्यास करताना वाचन सूक्ष्म रीतीने करावे, म्हणजे त्याचा लाभ मुख्य परीक्षेला होतो. गेल्या दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की, पूर्व परीक्षेला जे प्रश्न विचारले जातात, त्यांचा दर्जा उच्च असतो. त्यामुळे उथळ अभ्यास करून उत्तीर्ण होणे कठीण आहे. भारतीय राज्यघटनेचा पूर्व परीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा पेपर 2 याचा अभ्यासक्रम पाहून तयारी केल्यास मुख्य परीक्षेचा बराचसा अभ्यास हा पूर्व परीक्षेत होऊन जाईल. राज्यसेवेचा मागील पेपर 2 अभ्यासल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की, फक्त पुस्तक वाचून किंवा गाईड वाचून अथवा पाठांतर करून ही परीक्षा उत्तीर्ण होणे आता कठीण आहे. यासाठी विषय नेमका समजून त्यावर सखोल चिंतन करावे. दोन-तीन विद्यार्थ्यांचा गट तयार करून महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करावी. अभ्यासक्रमातील मुद्यांची चालू घडामोडींबरोबर सांगड घालून अभ्यास करावा. गटचच्रेमधून एखादा अवघड विषय सोपा होतो व प्रत्येक मुद्याचा अभ्यास करणे शक्य होते.

राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना या गोष्टी कटाक्षाने पाळाव्या ?

सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतची राज्य पाठय पुस्तक मंडळाची पुस्तके व्यवस्थित वाचावीत. त्यातील प्रत्येक मुद्दा समजून घ्यावा. जर शक्य असेल तर कमीत कमी शब्दांत टिपण तयार करून ठेवावे. नवीन अभ्यासक्रमानुसार जी क्रमिक पुस्तके आहेत, ती पुस्तके राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, तसेच या पुस्तकांचा अभ्यास केल्याने कोणताही विषय सविस्तर समजणे जास्त सोपे होते, जे या स्पर्धा परीक्षेसाठी अत्यावश्यक असते. जर विषय आपणास समजला असेल तरच प्रश्न सोडवणे शक्य होते. नाहीतर प्रश्नपत्रिका सोडविताना गोंधळ होण्याची शक्यता जास्त आहे. अभ्यासक्रमात दिलेले घटक एक-दोनदा वाचून, समजून घ्यावेत, म्हणजे अभ्यासाची दिशा चुकत नाही. पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षा यांच्या अभ्यासक्रमातील सारखेच बिंदू काढून त्याचा सखोल अभ्यास करावा. म्हणजे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा अभ्यास एकाच वेळी करणे शक्य होते. पूर्वपरीक्षा संपल्यानंतर जर मुख्य परीक्षेतला कालावधी कमी असेल तर कमीत कमी वेळात आपण जास्त अभ्यास करू शकतो. बाजारात विविध प्रकारचे अभ्यास साहित्य उपलब्ध आहे, तसेच निरनिराळ्या खासगी शिकवणी वर्गाच्या नोट्सदेखील सहजतेने उपलब्ध होतात. मात्र अभ्यास साहित्य वाचताना जर दर्जेदार पुस्तकांचे वाचन केले तरच त्याचा फायदा होतो, नाहीतर विनाकारण दर्जाहीन निकृष्ट अभ्यास साहित्य वाचल्याने पदरी निराशा येऊन वाटयाला अपयश येते.
चालू घडामोडी या घटकांचा अभ्यास करताना किती प्रश्न विचारले जातील, हे सांगणे कठीण असले तरी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांचा विचार केल्यास चालू घडामोडींचे ज्ञान असल्याखेरीज आपण पेपर चांगल्या गुणांनी पास होणे कठीण आहे. त्यासाठी रोज साधारणत: एक ते दोन वृत्तपत्रांचे नियमित वाचन करून त्याचे टिपण काढावे व त्याचे वेळोवेळी वाचन करावे.
गेल्या काही वर्षांपासून आयोग प्रश्न विचारताना चार ते पाच कधी कधी त्यापेक्षा जास्त ओळींची माहिती देऊन त्यावर प्रश्न विचारते. असे प्रश्न सोडविताना जर आपण वृत्तपत्रांचे व्यवस्थित वाचन केलेले असेल तर आपण त्याचे उत्तर देऊ शकतो. परीक्षेच्या ऐनवेळी या घटकाचा अभ्यास करून योग्यप्रकारे तयारी होत नाही.
भूगोलाचा अभ्यास करताना महाराष्ट्राच्या व भारताच्या भूगोलाच्या अभ्यासासोबत जगाचा भूगोलदेखील अभ्यासावा. भूगोलाचा अभ्यास करताना समोर नकाशा ठेवावा. वाचताना एखाद्या शहराचा उल्लेख आला असेल तर ते शहर नकाशात पाहून घ्यावे. गेल्या काही वर्षांपासून आयोग प्राकृतिक भूगोलावर बरेच प्रश्न विचारत आहे. म्हणून भूगोलाचा अभ्यास करताना पृथ्वीचे अंतरंग, खडकांचे प्रकार, निरनिराळी भूरूपे, वातावरण, वारे, आवर्त-प्रत्यावर्त तसेच स्थानिक वारे सागराचे अंतरंग, सागर जलाची क्षारता, सागराच्या क्षारतेवर परिणाम करणारे घटक, भरती-ओहोटी, मानवी वंश त्याचे वर्गीकरण, देशात महाराष्ट्रात तसेच जगात आढळणार्या विभिन्न जातीजमाती, लोकसंख्या लोकसंख्येचे वितरण इ. घटकांचा निश्चित अभ्यास करावा.
राज्यसेवा पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने पर्यावरण हा मुख्य घटक आहे. या संदर्भात वातावरण बदल, जैवविविधता, परिस्थितीकी, राष्ट्रीय उद्याने, जैवविविधता, वातावरण बदलासंदर्भात रिवो, कॅनकून परिषदांचा अभ्यास करावा. विज्ञानाचा अभ्यास करताना अवकाश तंत्रज्ञान, अणुऊर्जा, जैवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान यांचा अभ्यास करावा. तसेच मानवी आरोग्य विविध आजार यांचा अभ्यास करावा. पूर्वपरीक्षेला विज्ञानावर प्रश्न साधारणत: वैज्ञानिक घटकांवर व त्यांचा मानवासाठी होत असलेला उपयोग या घटकाच्या अनुषंगाने विचारले जातात. त्यामुळे हा घटक अभ्यासताना सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके वाचून ती समजून नंतरच या घटकाची तयारी करावी.
पूर्वपरीक्षेत सामान्य अध्ययन 1 व सामान्य अध्ययन 2 असे दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन 1 बरोबर सामान्य अध्ययन 2 हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
सामान्य अध्ययन पेपर 2 ची तयारी : या प्रश्नपत्रिकेत 80 प्रश्न 200 गुणांसाठी दोन तासांत सोडवायचे असतात.
प्रामुख्याने वेळेचे नियोजन जमले नाही. कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, याचा योग्य अंदाज बांधता आला नाही . पुढील परीक्षेसाठी तयारी करताना या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रत्येक घटकासाठी जेवढा सराव करता येईल तेवढा सराव करणे आवश्यक आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये पुढील घटकांचा अंतर्भाव असतो.
  • आकलन – या घटकांतर्गत काही उतारे दिले असतात व त्यावर प्रश्न विचारले जातात. एमपीएससीच्या परीक्षेत आकलन या घटकांतर्गत उतारे हे मराठीत होते, ते मराठीत जरी असले तरी अगदी सोपे आहेत, त्यांचा सराव नाही केला तरी चालेल, या भ्रमात विद्यार्थ्यांनी राहू नये.
  • निर्णयक्षमता व समस्या निवारण – संघ लोकसेवा आयोगाच्या मागच्या दोन वर्षांच्या परीक्षेचा तसेच 18 मे रोजी झालेली परीक्षा लक्षात घेता या घटकांसाठी निगेटिव्ह मार्किंगची पद्घत नव्हती, म्हणून या घटकांवरील प्रश्न विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम सोडवावेत.
  • सामान्य मानसिक क्षमता – या घटकांचा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित सराव करावा. सामान्यत: बुद्घिमत्ता घटकांतर्गत प्रश्न विचारले जातात तसेच प्रश्न या उपघटकांमध्ये विचारले जातात. या घटकांची तयारी विद्यार्थ्यांनी आतापासून करावी.
  • मूलभूत अंकगणित व तक्ता आलेख – या घटकाबाबत विद्यार्थ्यांच्या मनात नेहमी भीती असते. कारण कोणत्या वेळी गणिताचा किती भाग समाविष्ट होईल हे सांगता येत नाही. याची तयारी करताना विद्यार्थ्यांनी काळ, काम आणि वेग, शेकडेवारी, सरासरी, जहाजाचा वेग इ.संबंधी उपघटकांचा व्यवस्थित सराव करावा.
  • इंग्रजी भाषेचे आकलन – राज्यसेवेच्या परीक्षेत या घटकावर दोन उतारे विचारले होते, यात जे उतारे दिले जातात. ते फक्त इंग्रजी भाषेतूनच असतात. त्याचे मराठी भाषांतर नसते. परंतु या उपघटकांवरील उतारे हे तुलनेने सोपे असतात. जर इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा सराव केला तर हा घटक सोपा होतो.

6 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here