MPSC-UPSC : आमच्या दोन वीताच्या पोटाची भ्रांत असणा-या मायबाप सरकारास…!!!

mpsc student andolan%2Bekta
“सुप्त चैतन्य व निद्रीस्त शक्ती जागृत करण्याचे प्रभावी साधन म्हणजेच शिक्षण” असं विनोबा भावे सांगून गेले. पण, सध्याच्या घडीला एम.पी.एस.सी च्या अवकाशात शासकीय पदाची स्वप्न पाहणा-यांमधलं अभ्यासू चैतन्य अन् वैचारिक शक्ती दिवसेंदिवस क्षीण होत चाललीय. सरकारहो दिवसेंदिवस पुढे ढकलत चाललेल्या परीक्षांच्या तारखा, आयोगाकडून रखडलेले परीक्षांचे निकाल अन् वारंवार परीक्षापध्दतीचे बदलत चाललेले स्वरुप यां सर्व गोष्टींचा नकारात्मक परिणाम आता आम्हा एम.पी.एस.सी करणा-यांच्या मनाला असह्य चटके देत आहे.
एम.पी.एस.सी निवडणारे आम्ही, सामान्य नक्कीच नाही आहोत कारण या मार्गाद्वारे सामाजिक भान, सामाजिक जबाबदारी व सामाजिक कर्तव्य यांचा विडा उचलून जनसेवेचे व्रत आम्ही अंगिकारणार आहोत. सध्याच्या कोरोना व लॉकडाऊनच्या काळात आधीच जीव मुठीत घेऊन बसलेलो आम्ही, आयोगाच्या परीक्षेसंदर्भातल्या या प्रलंबित कार्यवाहीमुळे जीवाला मुकतो की काय अशी केविलवाणी परिस्थितीत कोंडलो गेलोय. रुपया रुपया जोडून कुणाची आई तर कुणाचा भाऊ आपलं पोरगं पास हुईल, आपलं नाव करील, सरकारी हापीसर हुईल ह्या आशेनं स्वत:च्या स्वप्नांचा चुराडा करुन, पोटच्या लेकरांना पैसे पाठवत आहेत. घोटभर चहाची वाणवा करुन, काही गरीब विद्यार्थी रिकाम्या पोटी, आतडी कळकळ करीत, स्वप्नांचाच घास करीत, पुस्तकांमधल्या प्रश्नोत्तरांनी आपलं पोट भरीत आहेत. या परिस्थितीत आयोगाच्या चालढकल धोरणांमुळे विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतली पदाची स्वप्नं आसवांच्या रुपानं बाहेर पडत आहेत यासारखी निर्दयी चेष्टा दुसरी नाही असचं म्हणावं लागेल…!
मायबाप सरकार हो, संघर्ष हा एम.पी.एस. सी करणा-यांच्या केवळ रक्तातच न्हवे तर डी.एन.ए. मध्ये असतो हे कितीजरी सत्य असलं तरी, आयोगाचा अनागोंदी कारभार, विद्यार्थ्यांच वाढत चाललेलं वय, घरच अठराविश्व दारिद्र्य, समाज-नातेवाईक यांच्याकडून होणारी अवहेलना, या गोष्टी आचके उचके देत राहतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल दिवसेंदिवस खच्ची होत चाललेय. एज बार झाल्यानंतर, पद हातात नसल्यावर, बेरोजगारीचा फास ही आवळत चाललाय. एकेकाळी चांगल्या पगाराची विद्यार्थ्यांची स्वप्नं ही ‘उधारीवर’ विकली जात आहेत यासारखे दुर्देव नाही. एम.पी.एस.सी. चा धसका घेतलेले काहीजण ‘आत्महत्त्येचा’ विखारी मार्ग अवलंबू मोकळे झाले. जिथे स्वत:चा जीव देऊनही विद्यार्थ्यांना परीक्षासंदर्भातले न्याय्य धोरण वेळोवेळी मिळत नसेल त्या शिक्षण व नियमपध्दतीला काय म्हणावे ?
सरकार, तुम्ही लॉकडाऊन तर केलात, पण यामध्ये आम्हां विद्यार्थ्यांचे भवितव्यच ‘लॉक’ झालेय. दोन वेळच्या घासाची भ्रांत असणा-या घरांमधुनही एम.पी.एस.सी. चा अभ्यास करणारे कित्येक विद्यार्थी आहेत. त्यामुळे, दुष्काळात तेरावा महिना अशी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांची गत झाली आहे. काहीजण जवळचे पैसे संपल्याने शहरांतली लायब्ररी सोडून गावी परतले आहेत तिथे शेतात काम करुन, शेतातल्या ढेकळांमध्ये शासकीय अधिकारी पदाची पाहिलेली स्वप्नं विरघळतांना भरल्या डोळ्यांनी पाहायची वेळ त्यांच्यावर आली आहे.
या कोरोनाकाळात, मोर्चे, आंदोलने, बैठका हे चालते पण विद्यार्थ्यांच्या परीक्षा का चालत नाहीत? हा प्रश्न आम्हां विद्यार्थ्यांना स्वस्थ बसू देत नाहीय. स्वप्नांचा पाठलाग करताना आधीच दमछाक झालेला विद्यार्थी एम.पी.एस.सी. आयोगाच्या वेळखाऊ धोरणामुळे पार कोलमडुन गेलाय.
एम.पी.एस.सी. करणा-यांच आयुष्य हे अक्षरश: फाटलेल्या आभाळासारखं होत चाललय… कुठतरी चांगला अभ्यासाचे कष्ट करुन शिवण घालायला जावे पण दुसरीकडे आयोगाचे प्रलंबित व विलंबित धोरण सर्व प्रयत्नांची विण उसवून ठेवते. जिथ आभाळच फाटत चाललय तिथ कुठ व काय शिवत राहणार ? असा प्रश्न विद्यार्थ्यांना छळत आहे. मायबाप सरकार हो, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष़्याची धुळधाण होता कामा नये इतकंच. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता आयोगाकडून, एम.पी.एस.सी. च्या रखडलेल्या परीक्षा वेळच्या वेळी घेण्यात याव्यात परिस्थिती लक्षात घेऊन, योग्य परीक्षा धोरण राबवावे ही आपणांस कळकळीची विनंती….
आपलाच विश्वासू,
नी३ अहिरराव, पुणे
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
Mob : 8551975985