औरंगाबाद जिल्हा माहिती मराठी

आशिया खंडातील 400 वर्षांत सर्वात जास्त वेगाने वाढलेले 52 दरवाजांचे शहर म्हणून औरंगाबादची ओळख आहे. यातच औरंगाबाद हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आल्याने सर्व स्तरावर पायाभूत सुविधा मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
ऐतिहासिक, सांस्कृतिक वास्तुकलेचा, शिल्पकलेचा वारसा आणि विविध प्रकारच्या वन आणि वन्यजीवांचा सहवास लाभलेला, शैक्षणिक चळवळींनी गाजलेला जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा होय.
जागतिक पातळीवर प्रसिद्ध पावलेले आणि युनेस्कोच्या जागतिक हेरिटेज वास्तूमध्ये समाविष्ट असलेली अजिंठा लेणी, यादव आणि मुघलकालीन इतिहासात गाजलेला दौलताबाद किल्ला आणि बिबी का मकबरा म्हणजे औरंगाबादचे भूषणच. औरंगाबाद शहराच्या विकासाची मुर्हूतमेढ रोवणाऱ्या मलिक अंबरचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरी यांचा उत्तम नमुना असलेली पाणचक्की, शहराच्या डोंगरमाथ्यावरील बौद्ध लेण्या आणि निसर्गरम्य परिसरात वसलेले तसेच अनेक शैक्षणिक चळवळींनी गाजलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अशी स्थळे ही पर्यटकांसाठी अभुतपूर्व अनुभव देणारी आहेत.
खाम नदीच्या तीरावर वसलेल्या औरंगाबाद शहराचे पूर्वी मलिक अंबरने फतेहपूर असे नामकरण केले होते. मुघल बादशहा औरंगजेबच्या नावावरुन शहराचे नाव औरंगाबाद ठेवण्यात आले. पैठणी साडी आणि हिमरु शालींसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहूया.

अजिंठा
औरंगाबाद शहरापासून 110 कि.मी. अंतरावर असलेल्या फर्दापूर गावाजवळ सातमाळाच्या डोंगर रांगात कोरलेली अजिंठा लेणी अत्यंत देखणी आणि शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव आहे.
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रयस्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांत सुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनात झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षण संस्थेसारखी आहे. अजिंठा लेण्या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या जीवनाची कथा दर्शवितात. तसेच संपूर्ण जगामध्ये कोणत्याही शिल्पामध्ये रंग भरलेले एकमेव उदाहरण म्हणजे अजिंठा लेणी आहे. येथे देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल असते.
अजिंठा व्ह्यू पाँईट येथे एमटीडीसीचे रिसॉर्ट आहे. लेणी पाहण्यासाठी संपूर्ण दिवस लागत असल्यामुळे पर्यटकांनी सकाळच्या वेळी पाहण्यास सुरुवात करणे योग्य.
अजिंठा येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.
वेरुळ
औरंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला, सह्याद्रीच्या रांगेतील सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेत, दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे. हैदराबादच्या निजाम राजवटीनंतर या इंदूरच्या होळकरांनी या लेण्यांची काळजी घेतली होती. मात्र इ.स. 1951 साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असलेल्या वेरुळ लेण्यामध्ये हिंदू, जैन आणि बुद्ध अशा तिन्ही धर्माचे शिल्प कोरलेले आहे. अशी ही लेणी देशतील एकमेव लेणी आहे.

पितळखोरा
औरंगाबाद-चाळीसगाव रस्त्यावर कन्नड गावाजवळ एका दरीत हा 13 लेण्यांचा समूह आहे. भारतामधील या सर्वात जुन्या लेण्या आहेत. इसवीसन पूर्व दुसऱ्या शतकातील या बौद्ध लेण्यात सुंदर शिल्पे व रंगीत भित्तिचित्रे आहेत. लेण्यांच्या पायथ्याशी भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांचे पाटण आहे. तेथील शिवमंदिरात प्रेक्षणीय कलाकुसर आहे. कन्नड येथील मारुती मंदिरात राहूचे मस्तक आकाशात ठोकरणाऱ्या विष्णू भगवंतांची मूर्ती आहे.
कसे जाल- येथे जाण्यासाठी औरंगाबाद येथून बस, मोटारगाडीची सुविधा आहे.
गौताळा अभयारण्य

 हे अभयारण्य मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य होय. औरंगाबाद शहरापासून 75 कि.मी.अंतरावर, कन्नडपासून 5 कि.मी. अंतरावर तर चाळीसगावपासून 20 कि.मी.अंतरावर आहे. औरंगाबाद आणि धुळे यांना जोडणारा राज्य महामार्ग क्र.211 या अभयारण्यातूनच जातो.

कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर अनेक प्रकारची झाडे, फुलझाडे दिसतात. पुढे गेल्यानंतर चंदनाच्या वनामधून वाहणारा एक नाला दिसतो त्याला चंदन नाला म्हणतात. याच्या काठाला मोर, पोपट असे रंगीबेरंगी पक्षी दिसतात. त्याचप्रमाणे सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबुल, कोतवाल आणि चंडोल पक्षी दिसतात. पुढे एक मारुतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. या तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. याठिकाणी पूर्वी गवळी लोक रहायचे. त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या. त्यावरून या तलावाला गौताळा हे नाव पडले आणि हेच नाव पुढे अभयारण्यालाही देण्यात आले.

गौताळा तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडूलिंब, चिंच या प्रकारचे वृक्ष आहेत. तळ्यात पाणडुब्या, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग न्याहाळता येतो.

गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते. ती उजवीकडच्या भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलीकडे मांजरमाळ डोंगर दिसतो. जंगलातले सर्व पाणवठे उन्हाळ्यात आटतात पण नागद तलाव, गराडा आणि निर्भोर या पाणवठ्यातील पाणी टिकून राहते. वन्यजीव उन्हाळ्यात याठिकाणी तहान भागविण्यासाठी येतात.

कसे जाल- अभयारण्यात वाहनाने किंवा पायी फिरता येते. येथे जाण्यासाठी बस, मोटारगाडीने जाण्याची सुविधा आहे.

घृष्णेश्वर मंदिर १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले हे प्राचीन शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे ११ कि. मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात याठिकाणाचे उल्लेख मिळतात.

दौलताबाद
औरंगाबादपासून 15 कि.मी अंतरावर व वेरुळजवळच असलेला दौलताबाद किल्ला. पूर्वी देवगिरी किल्ला म्हणून ही ओळखला जात होता. यादव मुहम्मद तुघलकसारख्या इतिहासाची साक्ष घेऊन शत्रूच्या पकडीत कधीही न आलेला किल्ला आजही ताठ मानेने उभा आहे. हा किल्ला जगभरातील गडप्रेमींना आजही आकर्षित करीत आहे.

त्याचबरोबर किल्ल्यामध्ये बांधलेले चांदमिनार हे अत्यंत देखणे आहे. जे त्या काळातील वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.

म्हैसमाळ
वेरुळ-खुलताबाद येथून जवळच डोंगरमाथ्यावर वसलेले म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण, हिल स्टेशन म्हणून पर्यटकांना आकर्षित करते. पावसाळ्यात तर येथे निसर्गाचे रुपडे अनुभवण्यासाठी पर्यटकांची रेलचेल असते.

छत्रपती शिवाजी महाराज म्युझिअमऔरंगाबाद महानगरपालिकेने स्थापन केलेल्या या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी निगडीत वस्तु, शस्त्रे, 500 वर्षांपूर्वीचे शुद्ध सामग्री, पैठणी साडी, औरंगजेबाचे हस्तलिखित कुराण प्रेक्षकांसाठी उपलब्ध आहे.

सिद्धार्थ उद्यान आणि प्राणी संग्रहालयशहराच्या मध्यवर्ती भागात असलेले सिद्धार्थ उद्यान कुटुंबासाठी विसाव्याचे स्थान बनले आहे. येथे मत्स्यालय, विविध प्रकारचे प्राणी, लहान मुलांसाठी ट्रॉयट्रेन, विविध प्रकारच्या खेळणी उपलब्ध आहे.

बीबी का मकबरा हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी हिची कबर आहे.

औरंगाबाद बसस्थानकापासून अंदाजे दोन किमी अंतरावर हे ठिकाण आहे.

सोनेरी महल विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल ऐतिहासिक राजवाडा आहे. सध्या या महलाचा उपयोग ग्रंथालय व ऐतिहासिक वस्तुंच्या संग्रहालयाच्या रुपात जतन करण्यात आले. तेथे काही वर्षांपासून वेरुळ-औरंगाबाद महोत्सव आयोजित केला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे इतिहास संग्रहालय या संग्रहालयात मराठा, राजपूत, मुघलकालीन ऐतिहासिक वस्तु, छायाचित्रे, वस्त्रप्रावरणे अत्यंत प्रेक्षणीय आहेत.

औरंगाबाद लेणी औरंगाबाद शहरातील डोंगररांगातील कोरलेली लेणी ही बौद्ध लेणी आहेत. बौद्ध लेणीच्या पायथ्याशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निसर्गरम्य परिसर पसरलेला आहे. तर शेजारीच पानचक्की ही पर्यटकांचे आकर्षण आहे.

सलीमअली सरोवर औरंगाबाद मध्यवर्ती स्थानकापासून काही मिनिटांच्या अंतरावरच सलीमअली सरोवर असून मुघल काळात हे सरोवर खिझरी (Khiziri) तलाव म्हणून ओळखले जात होते. हिवाळ्यांमध्ये परदेशी पक्षी मोठ्या प्रमाणात येतात. येथे पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे या सरोवराला पक्षीतज्ज्ञ सलीमअली यांचे नाव देण्यात आले. शेजारीच दिल्ली गेट आणि हिमायत बाग आहे. या बागेमध्ये विविध प्रकारची झाडे तसेच फळ संशोधन केंद्र ही पर्यटकांसाठी खुले आहे.

कलाग्राम सिडको बसस्थानकापासून जवळच पर्यटकांना फिरण्यासाठी एमटीडीसी आणि महानगरपालिकेने फ्रूड आणि क्राफ्ट बाजाराची सुविधाही कलाग्रामच्या रूपाने उपलब्ध करून दिली आहे. येथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी जागा असून खरेदीसाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत.

सारोळा आजपर्यंत दुर्लक्षित असलेले सारोळा हे एक हिल स्टेशन ही औरंगाबाद-अजिंठा मार्गावर चौका गावाजवळील डोंगरमाथ्यावर वसलेले आहे. चौका गावाच्या मुख्य रस्त्यावर उभारलेले जपानी वास्तुकलेच्या आधारावर बांधण्यात येत असलेले त्रैलोक्य बुद्ध विहार ही भाविकांसाठी उपलब्ध आहे.

जामा मस्जिद मलिक अंबरने बांधलेली जामा मस्जिद मुस्लिम धर्मियांसाठी प्रसिद्ध धार्मिकस्थळ आहे. त्याचबरोबर शहागंज मस्जिद काही अंतरावरच आहे.

खुलताबाद-सुफी संत फार पूर्वी या गावाचे नाव रौझा असेही होते. ज्याचा अर्थ स्वर्गातील नंदनवन असा होतो. तसेच या गावास संतांची भूमी ही म्हटले जाते. याचे कारण 14 व्या शतकात अनेक सुफी संत याठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना खुलदाबाद येथेच दफन करण्यात आले.

खुलताबाद मध्ये दफन करण्यात आलेले प्रसिद्ध सुफी संत आणि मुघल राजे

• मुघल सम्राट औरंगजेब यांची कबर
• आझम शाह आणि पत्नीची कबर
• झैन उद दिनचा दर्गाह
• बुरहान उद दिनची मशीद
• निझाम-उल-मुल्क असफ जाहची कबर
• बानु बेगमचा मकबरा
• खान जहानची लाल बाग
• मलिक अंबरची कबर

झर झरी झर बक्ष आणि गंज रवन गंज बक्ष दर्गाह येथील उरस प्रसिद्ध आहे.

पैठण

 हे शहर महाराष्ट्रातल्या औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असून पूर्वी शालिवाहन राजाची राजधानी म्हणून यास महत्व आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हे शहर संत एकनाथ यांच्यामुळे जागतिक नकाशावर आपला ठसा उमटवत असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून याचे महत्व वाढत आहे. एकनाथषष्ठी हा येथील मुख्य उत्सव असून या तीन दिवसीय उत्सवासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 5 ते 6 लाख भाविक पैठणमध्ये येतात. येथे अनेक मठ मंदिर असून वारकरी शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी येथे राहतात.
पैठणने जगास अनेक नररत्नेड दिली असून शून्याचा शोध लावणारे गणितज्ज्ञ भास्कराचार्य, संत भानुदास, संत एकनाथ, कवी मुक्तेाश्वर, संत गावोबा, निर्णयसिंधुकार भट्टोजी दीक्षित, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट, गानकलेत निष्णात असणारे नाथवंशीय रामचंद्रबुवा, मय्याबुवा, छ्य्याबुवा, काशिनाथबुवा त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रातील कांग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भारताचे माजी गृहमंत्री शंकरराव चव्हाण आदींचा त्यात समावेश होतो. संत ज्ञानेश्वर उद्यान, नाथसागर, पैठणी साडी केंद्र इत्यादीमुळे शहरास पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळाला आहे.
जायकवाडी धरण हे धरण गोदावरी नदीवर असलेले औरंगाबाद जिल्ह्यामधील एक प्रमुख धरण आहे. विदर्भातील जवळजवळ 2.40 लाख हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.
औरंगाबादला जाण्यासाठी रेल्वे, विमान, एस.टी. बसेस आणि खाजगी वाहनांनी जाता येते. येथे राहण्यासाठी एमटीडीसीचे रिसॉर्ट आहेत तसेच पंचतारांकित खाजगी हॉटेल, ठिकठिकाणी ढाबे यांची रेलचेल आहे.
अधिक माहितीसाठी एमटीडीसीच्या www.maharashtratourism.gov.in वर भेट द्या किंवा औरंगाबाद येथील एमटीडीसी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0240-2343169 यावर संपर्क साधता येईल. मुंबईतील मुख्य ऑफिसला संपर्क करण्यासाठी दूरध्वनी क्र. 022-22044040, 022-22845678, टोल फ्री क्रमांक 1800229930.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here