राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 भूगोल विषयाचा अभ्यास कसा करावा ?

राज्यसेवेचा अभ्यास असो वा यू.पी.एस.सी.चा अभ्यास, एक महत्त्वाचे सूत्र आहे, ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे.

फक्त पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे यश मिळवणे असे नाही तर आपल्याला पूर्व, मुख्य व मुलाखत या प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होणे आवश्यक आहे. म्हणून पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताना मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम नेहमी डोळ्यासमोर ठेवावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावेत. त्याचा फायदा असा आहे की, यामुळे अभ्यास जास्त सविस्तर आणि परिपूर्ण होण्यास मदत होते. शिवाय मुख्य परीक्षेला अभ्यासाचे कमी दडपण असते. राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश आहे.

how to prepare mpsc rajyaseva 2019

 

महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा- प्राकृतिक, सामाजिक व आर्थिक-भूगोल. जर आपण यू.पी.एस.सी.चा अभ्यासक्रम बघितला तर त्यात भारताचा व जगाचा प्राकृतिक, सामाजिक व आíथक भूगोल आहे. त्यात फक्त महाराष्ट्राचा भूगोल नाही.

महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल ज्यात महाराष्ट्रातील डोंगररांगा, त्या डोंगररांगेतील महत्त्वाची शिखरे त्या डोंगररांगा कोणत्या जिल्ह्य़ात पसरलेल्या आहेत, इ. चा अभ्यास करावा. नदीप्रणाली अभ्यासताना त्या नद्यांवरील विविध प्रकल्प, महाराष्ट्राची पीकप्रणाली. महाराष्ट्राची मृदा, महाराष्ट्राचे हवामान, खनिज संपत्ती, वाहतूक व्यवस्था, विविध शहरे व पर्यटन केंद्र यांचा सविस्तर अभ्यास करावा.

हा अभ्यास करतानाच महाराष्ट्राचा जिल्हावार अभ्यास करावा. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात काय महत्त्वाच्या घडामोडी झाल्यात यांचा अभ्यास केल्यास चालू घडामोडींचा देखील अभ्यास होतो. शक्यतो महाराष्ट्राचे कोरे नकाशे घेऊन त्यावर जिल्हावार नोट्स तयार केल्यास अधिक उत्तम. कारण परीक्षेच्या काळात कमी वेळेत या विषयाची उजळणी पूर्ण होते.

महाराष्ट्राच्या सामाजिक भूगोलाचा अभ्यास करताना २००१ व २०११ च्या जनगणनेचा सविस्तर अभ्यास करावा. महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, तिचे वितरण, लिंग गुणोत्तर, माता मृत्युदर, अर्भक मुत्युदर यांचा अभ्यास स्वतंत्र तक्ता बनवून तुलनात्मक दृष्टीने करावा.

महाराष्ट्राची लोकसंख्या, लोकसंख्येचा चढता-उतरता क्रम, घनतेचा चढता-उतरता क्रम स्वतंत्र वहीत लिहून त्याचे वारंवार वाचन करावे. महाराष्ट्रातील वस्तीप्रणाली ग्रामीण व नागरी वस्त्या, त्यांच्या समस्या यांचा अभ्यास करावा. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जिल्हावार अभ्यास करताना महाराष्ट्रातील विविध जाती-जमाती लक्षात ठेवाव्यात.

महाराष्ट्राचा आर्थिक भूगोल अभ्यासताना महाराष्ट्रातील खनिज संपत्ती, त्यांचे वर्गीकरण, ऊर्जासाठे, त्यांचे उत्पादन, जिल्हावार वर्गीकरण, त्यांचे विविध प्रकल्प, आयात-निर्यात यांची माहिती, त्यांचा क्रम यांचा अभ्यास नकाशाच्या मदतीने करावा. वरीलप्रमाणे अभ्यास केल्यास आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर – १ मधील  पुढील विषयांचा अभ्यास होण्यास मदत होते.

  1. महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
  2. आर्थिक भूगोल
  3. महाराष्ट्राचा मानवी व सामाजिक भूगोल
  4. लोकसंख्या भूगोल
भारताचा भूगोल :

जर आपण राज्यसेवा व यु.पी.एस.सी.चा अभ्यास करीत असाल तर हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. भारताचा प्राकृतिक विभाग अभ्यासताना हिमालय, हिमालयाच्या डोंगररांगा त्यांची विभागणी, हिमालय पर्वतातील महत्त्वाच्या खिंडी, हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या, त्यावरील निरनिराळे प्रकल्प, मदानी प्रदेश, त्यांचे वितरण, भारताचा पठारी प्रदेश, पठारावरील निरनिराळ्या डोंगररांगा, पूर्वघाट, पश्चिम घाट, अंदमान, निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे यांचा अभ्यास करावा. भारताच्या हवामानाचा अभ्यास करताना भारतीय मान्सून, त्याचा उदय, पावसाचे वितरण, भारतीय हवामानावर एल् निनो ला-निना यांचा प्रभाव, अवर्षण पूर यांचा अभ्यास करावा.

भारतीय सामाजिक व आíथक भूगोलाचा अभ्यासात २००१ व २०११ च्या जणगणनेचा तुलनात्मक अभ्यास, भारतीय लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, साक्षरता, स्त्री-पुरुष प्रमाण, बाल मृत्युदर, माता मृत्युदर या मुद्दय़ांवर विशेष भर द्यावा. त्याच प्रमाणे भारतातील नागरीकरण, नागरीकरणाच्या समस्या, झोपडपट्टींचा प्रश्न, केंद्र सरकार-राज्य सरकार यांनी या समस्या सोडविण्यासाठी योजलेले उपाययोजना यांचा अभ्यास करावा. भारतात आíथक भूगोल अभ्यासताना खनिज संपत्ती, उद्योगधंदे, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, वाहतूक व्यवस्था यांचा अभ्यास करावा. अभ्यास करताना नकाशाचा जास्तीत जास्त वापर करावा.

जगाचा भूगोल :

जगाचा भूगोल अभ्यासताना सर्वप्रथम नकाशावरील महत्त्वाचे भाग मार्क करून त्याचा अभ्यास करावा. उदा. निरनिराळ्या देशातील पर्वतरांगा, नदीप्रणाली, महत्त्वाची सरोवरे इ. नंतर जगाचा अभ्यास. खंडाप्रमाणे केल्यास जास्त सोपा होतो. उदा. अमेरिकेचा अभ्यास करताना दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका यांतील पर्वतश्रेणी, नदीप्रणाली, विविध सरोवरे, त्यांचा दक्षिण उत्तर क्रम, खनिज संपत्ती, निरनिराळे प्रकल्प, महत्त्वाची शहरे असा अभ्यास करावा.

यूपीएससीच्या मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेतल्यास महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे या घटकावर साधारणत: प्रश्न नकाशावर विचारले जातात. म्हणून एक चांगला नकाशा घेऊन त्याचा अभ्यास केल्यास अवघड प्रश्नांची उत्तरे देणे सोपे होते. याशिवाय जगातील शेतीप्रणाली, उद्योगधंदे, जंगल, मासेमारी, खनिज संपत्ती यांचे तक्ते बनवावेत.

भूगोलाचा अभ्यास करताना फक्त भूगोलाचाच अभ्यास होत नाही तर सामान्य अध्ययनातील चालू घडामोडींचाही अभ्यास होत असतो. म्हणून या घटकाचा अभ्यास करताना पुढील संदर्भ ग्रंथांचा आधार घ्यावा.

  • महाराष्ट्राचा भूगोल – ए.बी.सवदी/के ए खतीब/दिपस्तंभ
  • भारताचा भूगोल – डॉ. अनिरुद्ध, विठ्ठल पुंगळे
  • भारताचा भूगोल geography of india (मराठीत) माजिद हुसेन
  • जगाचा भूगोल – माजिद हुसेन (मराठीत)
  • महाराष्ट्र बोर्डाची सहावी ते दहावीपर्यंत भूगोलाची पुस्तके
  • यूपीएसीसाठी पाचवी ते दहावीपर्यंतची सी.बी.एस.सी. बोर्डाची पुस्तके तसेच

इंडिया इयर बुक जे अद्याप बाजारपेठेत यायचे आहे. (भारत सरकारचे) ते मात्र यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी नक्की वाचावे, त्याचप्रमाणे एम.पी.एस.सी. मुख्य परीक्षेसाठी हे पुस्तक वाचणे आवश्यकच आहे.

संकलन :- स्पर्धावाहिनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here