MPSC स्पर्धा परिक्षा द्यावी का ?

बरेच उमेदवार स्पर्धा परीक्षा देतात ते नातेवाईकांपैकी कोणीतरी सरकारी सेवांमध्ये असतात म्हणून, किंवा मित्रमैत्रिणींच्या प्रभावाने किंवा चक्क चित्रपटातील एखादी व्यक्तिरेखा भुरळ पाडते म्हणून (उदा. सरफरोश मधील आमिर) सुरुवातीला अशा धुक्यातून (अज्ञानाच्या) फिरताना स्वप्नवत वाटते. पण लक्षात घ्या, प्रत्यक्ष सेवा करताना वास्तवाशी गाठ आहे. सरकारी सेवांबद्दल असलेली आपल्या मनातली प्रतिमा व प्रत्यक्षातील वास्तव यांचा मेळ बसेलच असे नाही. हा फरक इतका मोठा असू शकतो की त्यातून भ्रमनिरास होऊन सगळी उमेद संपू शकते. आणि उमेद संपली की माणूस संपायला वेळ लागत नाही.
mpsc exams
सगळ्या पंधरा ते वीस सेवा एकाच परीक्षेतून मिळत असल्या तरी प्रत्यक्षात त्यांच्या अधिकार व जबाबदाऱ्यांच्या चौकटीत जमीन आसमानाचा फरक पडतो. त्यातील एकादी सेवा एखाद्याला खूप आवडू शकते तर तीच सेवा दुसऱ्यासाठी कंटाळवाणी ठरू शकते. अशा वेळी उमेदवारांकडून अग्रक्रम भरून घेऊन त्यांच्या रँक प्रमाणे सेवा देणे हा प्रकार फार वरवरचा ठरू शकतो.
उमेदवार जेव्हा मुख्य परीक्षेचा फॉर्म भरतात तेव्हा सेवा निवडताना ते काही ठराविक सेवांना चटकन अग्रक्रम देतात उदा. आय. ए. एस., आय. पी. एस. इत्यादी कारण ते त्यांचे स्वप्न असते. पुढचे अग्रक्रम ते इतरांशी जुजबी चर्चा करून अंदाजाने भरतात. हे उमेदवार आपण आयएएसच बनणार आहोत या कल्पनेने झपाटलेले असतात. काही तर पहिल्या दोन/ तीन सेवाच भरतात व पुढचे अग्रक्रम भरतसुद्धा नाहीत. (खाईन तुपाशी नाहीतर राहीन उपाशी) थोडक्यात बहुसंख्य उमेदवारांनी प्रमुख आकर्षक सेवांचाच विचार केलेला असतो. इतर सेवा (उदा. भारतीय व्यापार सेवा, माहिती सेवा) त्यांच्या खिजगणतीतही नसतात. प्रत्यक्षात सत्य हे आहे की ८० टक्के उमेदवारांना या इतर सेवांमध्ये आयुष्य काढावे लागते. (ज्यांचा विचार करणेही आधी त्यांना वेळेचा अपव्यय वाटला असतो) असे खूप कमी उमेदवार असतात की त्यांना पसंतीची सेवा मिळते व ते खूष असतात. इतरांना हवी ती सेवा न मिळाल्याचा सल आयुष्यभर राहतो. कोणीतरी नाकारल्यासारखी भावना मनात कायमची घर करून बसते. (उत्तीर्ण होऊनही निराशा निर्माण करणारी स्पर्धा परीक्षा ही एकमेव परीक्षा असावी)
जगाच्या दृष्टीने यशस्वी पण स्वत:च्या मनाच्या निकषांवर अयशस्वी उमेदवार पुन्हा पुन्हा परीक्षा देत राहतात. हा खेळ कधीकधी नऊ ते दहा वर्षे चालतो. म्हणजे जवळजवळ एक तृतीयांश कामाच्या आयुष्यात करियर निश्चित झालेलेच नसते. असे उमेदवार स्वत:वर व जगावर चिडलेले असतात. ते तिरसट होत जातात. कोणालाही आपली खरी (?) किंमत कळू शकलेली नाही असे त्यांना वाटते. पुढच्या वळणावर आणखी काहीतरी चांगले असेल, असा समज करून घेऊन ते स्वत:ची फरफट करून घेतात. यावर्षी यशस्वी उमेदवारांच्या यादीत एक उमेदवार असा आहे ज्याने आधी रेल्वे ट्रॅफिक सेवा (IRTS) मिळवली. नंतर तो पुन्हा परीक्षा देऊन पोलिस सेवेत (IPS) शिरला. तेथेही न रमल्याने त्याने प्रशासन सेवा (IAS) प्राप्त केली. पण त्याला हवे राज्य न मिळाल्याने त्याने तीही सोडून दिली. पुन्हा परीक्षा देऊन तो आता राजस्व सेवेत (IRS) आला आहे. या सेवेतही किती काळ राहील हे सांगता येत नाही. या उदाहरणात पद मिळवणेच करियर झाले आहे. मग सेवा कधी करणार व त्यातून स्वत:ची व देशाची प्रगती साधणार तरी कधी?
परीक्षा देऊन सेवा मिळवताना असलेल्या कल्पना व प्रत्यक्षातील वास्तव यांची सांगड घालणे गरजेचे आहे. आपणाला मिळू शकणाऱ्या पदांची, त्यातल्या जबाबदाऱ्यांची व त्यातून होऊ शकणारी प्रगती व मिळणारे समाधान याची आधीच योग्य कल्पना असेल तर निश्चितच काही प्रमाणात ही पुढची शोकांतिका टाळता येईल. सुरुवात आपण राज्यसेवा आयोगाची परीक्षा देऊन मिळणाऱ्या पदांनी करू. ही आपण त्यांच्या खात्यानुसार करू म्हणजे पदांची उतरंड समजणे सोपे जाईल.
आजच्या प्रशासकीय सेवांची पाळेमुळे ब्रिटिश काळापर्यंत जातात. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी जिल्हा हे प्रशासनाचे प्रमुख एकक पकडून प्रशासकीय संरचना उभी केली. ही मूळची संरचना महसूल हा आधार मानून तयार केली आहे. जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी उदा. जिल्हाधिकारी जरी यूपीएससीकडून निवडले जात असले तरी ते राज्य सरकारच्या अधिपत्याखाली काम करतात. जिल्हाधिकारी हा आरंभ मानला तर महसूल सेवा कोतवालापर्यंत पोहचते.