हळू हळू यशाकडे जाणारा मार्ग खडतर का वाटू लागतो? नक्की वाचा..!

आयुष्यात यशस्वी होण्याची असंख्य कारणे असतात. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला मिळणारं यश हे त्याच्या कठोर परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी, आवड, ज्ञान अश्या महत्वपूर्ण गोष्टीमुळे प्राप्त झालेलं असतं. यश हे सहजा सहजी कधीच मिळत नाही. ते मिळवण्याकरता प्रत्येक व्यक्तीला खडतर प्रवास करावाच लागतो. अर्थात, ह्या सर्व गोष्टी साध्य करण्याची क्षमता त्या व्यक्ती मध्ये असायला हवी.

यशाकडे वाटचाल करत असतांना आपल्याला बऱ्याचदा एक गोष्ट पाहायला आणि अनुभवायला मिळते आणि ती म्हणजे कमतरता. आणि ही कमतरता नेहमी कष्ट, जिद्द किंवा आत्मविश्वास यांचाशीच निगडीत असते असे नाही. कधी कधी असंही होतं की सर्व व्यवस्थित चालू असूनही यश मिळण्याची खात्री मनाला वाटत नाही. कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं आणि आपल्याला काय कमी पडतंय नेमकं हेच कळत नसतं.

हळू हळू यशाकडे जाणारा मार्ग खडतर वाटू लागतो, मनातील आशाही मंदावतात आणि सगळ्याच गोष्टी अशक्य वाटू लागतात. आपल्या हाती फक्त अपयशच लागणार असं वाटू लागतं.

  • असं का होत असेल बरं?
  • आपण कुठे कमी पडतो का?
  • आपले प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वास ह्याची ताकद कमी होऊन जाते का?
  • की आपल्यात मुळात तेवढी क्षमताच नसते यशा पर्यंतची वाटचाल करण्याची?

प्रश्न अनेक पडतात पण उत्तर सापडत नाही. असा कटू अनुभव बहुतांशी लोकांच्या वाट्याला येतो आणि ते यशस्वी व्हायचे राहूनच जातात. मग, ही यशस्वी लोकं यश मिळवतात तरी कशी ? फार कुतूहल वाटतं ना?

पण यातच तर आपल्या प्रश्नांची उत्तरे दडली आहेत. खरं तर यशाकडे जातानाचा प्रवास हा एकट्याने करायचाच नसतो. यशाची वाटचाल करताना सोबत ही हवीच. आणि सोबत अशी असावी जी नेहमी आपल्याला प्रेरणा देत राहील. प्रेरणा. ह्याच गोष्टीची कमतरता असते बहुतांशी लोकांकडे.

बाकी सर्व गोष्टी असल्या मात्र यशापर्यंत जाण्याची प्रेरणाच मिळत नसेल तर सर्वच अशक्य वाटू लागते.म्हणूनच मनात आशेचा दिवा तेवत ठेवण्यासाठी एखादी व्यक्ती किंवा गोष्ट जवळ असणं फार महत्वाचं असतं. पण प्रेरणा मिळते कशी ? की ती घ्यावी लागते? आता ही गोष्ट मात्र नशिबानेच घडते.

प्रेरणा देणाऱ्या लोकांची साथ काहींना मिळते तर काहींना नाही मिळत. ज्यांना मिळते ते वाटचाल करत राहतात, ज्यांना मिळत नाही ते एक तर शोध घेतात किंवा थांबून जातात. खरं तर आपल्याला कोणीतरी प्रेरणा द्यावी, किंवा ती मिळावी अशी अपेक्षा करणे चुकीचे वाटते. प्रेरणा ही शोधली तर नक्कीच सापडते कारण जगात असंख्य गोष्टी आहेत ज्यांपासून आपण प्रेरणा घेऊ शकतो.

ज्या पासून आपल्याला प्रेरणा मिळते त्याला म्हणतात प्रेरणास्थान. प्रेरणास्थान फक्त व्यक्तीच असते असे नाही तर ते काहीही असू शकते. सजीव, निर्जीव, व्यक्ती, निसर्ग, किंवा अशी कोणतीही गोष्ट जीच्याकडे पाहून आपल्याला नवीन उमेद मिळते, पुढे जाण्याची आणि यश मिळवण्याची. एखाद्यासाठी एखादं गाणं, तर एखाद्यासाठी एखादा चित्रपट प्रेरणादायी असू शकतो, एखाद्या साठी त्याचे आई, बाबा, मित्र प्रेरणादायी असू शकतात तर एखाद्यासाठी सकाळी बागेत फुलणारं फुलही प्रेरणादायी असू शकतं.

काहींना बाहेरील गोष्टीकडून प्रेरणा मिळत नाही त्यामुळे ते स्वतः मध्ये प्रेरणा मिर्माण करतात आणि यशस्वी होऊन दुसऱ्यांसाठी प्रेरणास्थान बनतात. प्रेरणा कुठून आणि कशा स्वरुपात मिळतेय हे महत्वाचं नसतं मात्र प्रेरणा मिळणं आणि मिळत राहणं फार महत्वाचं असतं.

सुंदर आयुष्य जगण्यासाठी पण प्रेरणा लागते. प्रेरणा द्या, प्रेरणा घ्या आणि यशस्वी व्हा. आयुष्य सुंदर आहे. लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेयर करा. धन्यवाद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here