loading...

रेल्वे भरती : ग्रुप-डी परीक्षेची तयारी कशी करावी?

loading...

रेल्वे विभागात ग्रुप ‘डी’ आणि ‘सी’करिता रेल्वे भरती बोर्डाद्वारे परीक्षा आयोजित केली जाते. लेखी परीक्षा व शारीरिक चाचणीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाते. येथे ग्रुप ‘डी’शी संबंधित परीक्षेबाबत माहिती जाणून घेऊ. रेल्वेत ग्रुप ‘डी’ची भरती वर्षभर सुरूच असते. रेल्वे प्रशासनाचा तो पायाच आहे.

रेल्वेत कोणत्या पदांचा समावेश होतो?
ट्रॅकमन, गेटमन, पॉइंटमन, हेल्पर इन मेकॅनिकल, हेल्पर इन इंजिनीअरिंग, पोर्टर, गँगमन, फिटर, केबिनमन, वेल्डर

शैक्षणिक पात्रता काय हवी?
ग्रुप ‘डी’साठी शैक्षणिक पात्रता १०वी+१२वी/ग्रॅज्युएट इतकी निर्धारित करण्यात आली आहे. यासोबतच उमेदवार आवश्यक त्या ट्रेडसह आयटीआय उत्तीर्ण असावा. प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळी पात्रता आहे.

वयोमर्यादा :
रेल्वेच्या ग्रुप ‘डी’साठी वयोमर्यादा १८ ते ३२ वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. एससी, एसटी, ओबीसी, एनटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमाप्रमाणे वयात सूट देण्यात येते.
परीक्षेचे टप्पे :

१) लेखी परीक्षा :
कुठल्याही जॉबसाठी लेखी परीक्षा हा सर्वांत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. यात मेरिट अंकांसह उत्तीर्ण होणारा उमेदवार परीक्षेच्या पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतो.

२) मेडिकल टेस्ट :
कुठल्याही जॉबकरिता उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि मजबूत होणे गरजेचे असते. ग्रुप ‘डी’मधील पदांवरील कर्मचाऱ्यांना कष्टाची कामे करावी लागतात. यामुळे ते धडधाकट असावे लागते. मेडिकल टेस्ट उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेच्या पुढील टप्प्यात प्रवेश दिला जातो.

३) प्रमाणपत्र पडताळणी :
लेखी आणि मेडिकल परीक्षा उत्तीर्ण करणारा उमेदवार प्रमाणपत्रे पडताळणी परीक्षेस पात्र ठरतो. या परीक्षेत उमेदवाराने फॉर्म भरताना दिलेल्या माहितीप्रमाणेच प्रमाणपत्रे आहेत का? ठरवलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराचे शिक्षण आहे का? याची कसून तपासणी केली जाते.

४) मेरिट लिस्टच्या आधारावर अंतिम निवड :
परीक्षेच्या तीनही टप्प्यात गुणवत्ता यादीत आलेला उमेदवारांची मेरिट लिस्ट लावली जाते. ज्याला सर्वांत जास्त गुण मिळाले तो गु्रप ‘डी’मधील संबंधित पदासाठी पात्र ठरतो.

अर्ज कसा करावा?
ग्रुप ‘डी’मधील पदाकरिता अर्ज करायचा असल्यास उमेदवाराला भरतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. ज्या विभागासाठी ही भरती आहे तो विभाग निवडावा लागेल. ऑनलाईन फॉर्म भरताना पासपोर्ट साइजच्या फोटोची, उमेदवाराच्या स्वाक्षरीची जाहिरातीत दिलेल्या साईजची स्कॅनिंग कॉपी असावी. अर्जाचे शुल्क क्रेडिट किंवा डेबिट कार्डने भरता येईल. ते जर नसेल तर तुम्ही बँक चालानची प्रिंट काढून आवश्यक असलेले शुल्क संबंधित बँकेत भरू शकता.

आवश्यक तारखा लक्षात ठेवाव्या?
परीक्षेसाठी अर्ज करताना तो ऑनलाईन पद्धतीने करायचा असल्याने रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरण्याची तारीख काय आहे, हे काळजीपूर्वक बघावे. शेवटच्या तारखेला फॉर्म भरताना वेबसाईट मंद होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून शक्य तितक्या लवकर फॉर्म भरावा.

परीक्षा स्वरूप :
ग्रुप ‘डी’साठी सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञानाशी संबंधित प्रश्न विचारले जातात. म्हणून सामान्य विज्ञान, भारताचा भूगोल, कृषी संबंधित माहिती, कॉम्प्युटरशी संबंधित प्रश्न, सामान्य अंकगणित आणि तार्किक प्रश्नांचा कसून सराव करावा.

परीक्षेची तयारी कशी करावी?
  • मागील वर्षांचे पेपर्स वेळेत सोडवून बघावे. इंटरनेटवर ऑनलाईन सर्च केल्यास हे पेपर सहजपणे मिळतील.
  • सामान्य ज्ञान वाढविण्यासाठी त्या संबंधित स्पर्धा परीक्षेची पुस्तके, वर्तमानपत्रे आणि मॅगझिन वाचाव्या. तुम्ही न्यूज चॅनेल्सही बघू शकता.
  • तार्किक प्रश्न हे कठीण वाटतात; पण एकदा का प्रश्न समजला की तो सोडवणे सोपे जाते. यामुळे तुमचे विचार आणि कल्पनाशक्ती वाढीस लागते.
  • जगात, देशात काय घडत आहे याविषयी जागरूक असावे.
  • ग्रुप स्टडी आणि ग्रुप डिस्कशनवर भर द्यावा. परीक्षेचा पॅटर्न समजून अभ्यास केला तर कमी वेळेत अधिक अभ्यास करता येतो.
  • स्वतःला नेहमी अपेडट ठेवावे. निर्धारित वेळेतच फॉर्म भरावा. अनेकदा वेळ निघून गेल्यावर फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला जातो. शेवटी तो व्यर्थ ठरतो.
  • परीक्षेत पहिल्या प्रयत्नात अपयश आले असले तरी प्रयत्न सोडू नये. अनेक उमेदवारांनी तर पाचदा परीक्षा दिल्यानंतर सहाव्या परीक्षेत यश कमावले. आपल्याला रेल्वेत नोकरी करायचीच आहे. यासाठी मी प्रामाणिक अभ्यास करील या निर्धारासह प्रयत्न केल्यास नक्कीच यशस्वी व्हाल.

Post a Comment

0 Comments