IAS विजय अमृता कुलांगे यांनी राज्यसेवा पूर्व, मुख्य आणि मुलाखतीची तयारी कशी केली व करावी ?

स्पर्धा परिक्षेत काही पूर्व परीक्षेला एकच पेपर, तर काही ठिकाणी दोन पेपर असतात. सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी, किंवा अजून वेगळे नाव. लाखो विद्यार्थ्यामधून काही शे किंवा काही हजार विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेला प्रवेश देण्यात येणार असतो. म्हणून हा टप्पा दुर्लक्षित करून बिलकुल जमत नाही.

 

kulange

 

  • हि परीक्षा प्रथम समजून घेतली पाहिजे. 
  • बहुपर्यायी प्रश्न असतात. 
  • अचूक पर्याय निवडायचा असतो.
  • या परीक्षेत अभ्यासक्रम दिलेला असतो.
  • मात्र तरीही प्रश्नाचे स्वरूप बऱ्याचदा अनिश्चित असते. 
  • परिक्षेत काय विचारतील.
  • कसे विचारतील याबद्दल काही स्वरुपात तरी अनिश्चितता असते.
अभ्यास तर गरजेचाच आहे..मात्र अभ्यासाचे तंत्र मुख्यतः पूर्व परीक्षेसाठी फार महत्वाचे आहे. विषयानुसार पुस्तके निवडणे..त्यातून नेमके मुद्दे बाहेर काढणे, त्याची छोटी छोटी टिपणे बनवणे, आणि याचा परीक्षाभिमुख विचार करता येणे जमले कि पूर्व परीक्षेचा टप्पा पार होऊन जातो.
प्रश्नाचे स्वरूप पहिले तर लक्षात येते कि काही प्रश्न सहज जमून जातात. त्यांची उत्तरे ठरलेली असतात. त्यात विचार करणे गरजेचे नसते. फक्त उत्तर माहित असायला हवे, म्हणजे ते वाचनात आलेले हवे. काही प्रश्न मात्र विचार करून सोडवावी लागतात. तिथे पर्याय वेगळ्या पद्धतीचे असतात. म्हणजे खालील चार पर्यायामधून फक्त.. एक बरोबर, एक आणि दोन बरोबर, दोन आणि तीन बरोबर, किंवा एक आणि चार बरोबर.. यापैकी एक योग्य पर्याय आपल्याला निवडावा लागतो. इथे विचार करून उत्तर निवडण्याचा निर्णय घ्यावा लागतो.
अशापद्धतीचे प्रश्न असल्याकारणाने अभ्यास करताना आपले तंत्रहि फार महत्वाचे असले पाहिजे. खूप लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. वाचा..समजून घ्या. अनेक घटकामधील साम्य आणि फरक समजून घेवून तुलनात्मक रीतीने मुद्दे लक्षात ठेवले पाहिजेत. आणि महत्वाचे म्हणजे कोणत्याही घटकाच्या संकल्पना समजून घेवूनच पुढे चाला..तसे जर केले नाही..आणि फक्त पाठांतरावर भर दिला तर पूर्व परीक्षा पास होणे कठीण आहे. एका मर्यादेपर्यंत पाठांतर मदत करू शकते..त्यापुढे समजून घेणे, visualize करणे जमले नाही तर तुम्ही काय काय पाठ करणार..पाठांतराला एक मर्यादा पडते.
लक्षात ठेवण्याच्या काही क्लुप्त्या विकसित करता आल्या पाहिजेत. जसे कि सारे राष्ट्रपती, त्यांची नावे लक्षात ठेवण्यासाठी त्यांची आद्याक्षरे जोडून एक सलग मजेदार संगती तयार करता येते..काही चार्ट, टेबल, आलेख या माध्यमातून आकडेवारीचे विश्लेषण करून तुलनात्मक आकडेवारी लक्षात राहून जाते.
एखाद्या माहितीचे मागील, पुढील संदर्भ शोधले पाहिजेत. त्याआधारे विश्लेषणाला मदत मिळते. दोन विषयामधील साम्यस्थळे शोधली पाहिजेत. त्याआधारे आपल्या लक्षात राहण्यास मदत होते.
व्यक्तीपरत्वे लक्षात ठेवण्याच्या क्लुप्त्या बदलू शकतात. पण हे जमले पाहिजे. पूर्व परीक्षेला वाचन भरपूर असले पाहिजे. अभ्यासक्रमाशी निगडीत सारे घटक डोळ्याखालून घातले पाहिजेत. किमान दोनदा तीनदा तरी तो घटक पाहायला हवा. समजून घ्यायला हवा.
चालू घडामोडीसाठी तुमचा आराखडा तयार असावा..चांगली दोन, तीन वृत्तपत्रे, मराठी आणि इंग्रजी..एखादे मासिक..आणि चालू घडामोडीची बाजारात असलेली दोन पुस्तके..यावर अधिक भर द्या..राज्यातील, देशातील, आणि जागतिक पातळीवरील महत्वाच्या घडामोडीची दखल घ्या. त्याची वहीत टिपणे ठेवा. हि टिपणे काढायची रोज सवय ठेवली तर तुमची स्वतःची एक चालू घडामोडीची वही तयार होईल. यात अनेक भाग करता येवू शकतात. सामाजिक, विज्ञानविषयक, पुरस्कार, क्रीडा, आंतरराष्ट्रीय संबंध, संरक्षण यासारख्या मुद्द्यांवर भर देता येवू शकतो.
गट चर्चा मात्र मर्यादित स्वरुपात, नेमकी आणि मोजक्या विद्यार्थ्यांनी केली तर त्याचाही फायदा मिळतो. पण विषय आधी निवडून चर्चेचे मुद्दे ठरवले पाहिजेत. म्हणजे गाडी रुळावर राहते..चर्चा आणि वादविवाद यात फरक आहे हे पण लक्षात ठेवले पाहिजे.
पेपर वाचताना काय वाचावे हे नक्की करा. विनाकारण सारा पेपर वाचण्यात वेळ घालवू नका. संपादकीय सदर वाचलेच पाहिजे. त्यावर विचार केला पाहिजे. गट चर्चा करताना या मुद्यांचा विचार होऊ शकतो. रोज अभ्यासाचे वेळापत्रक पाळण्याचा प्रयत्न करा. किमान सात ते आठ तास अभ्यास पूर्व परीक्षेसाठी करण्याची तयारी ठेवा..
पूर्व परीक्षेचे सराव पेपर अवश्य द्या. वेळ लावून पेपर सोडवल्याचा फायदा नक्कीच होतो. वेळेचे नियोजन कळते. कोणत्या घटकावर जास्त वेळ जातो ते कळते. परीक्षेचा नेमका विचार करण्याची सवय लागते. परीक्षेत पारंपारिक जे प्रश्न असतात, ते चुकून देवू नका..अशी उत्तरे आलीच पाहिजेत..त्यावर जास्त विचार करण्याची गरज नसते. एखादे उत्तर माहित नसेल तर त्या प्रश्नाची चुकीची उत्तरे शोधायची सवय विकसित केली पाहिजे..चार पर्यांयांचा विचार करता किमान दोन चुकीचे पर्याय तर नक्की शोधता येतात..म्हणजे बरो
बर उत्तर येण्याची शक्यता वाढते..त्यातून negative मार्क पद्धत असेल तर किती प्रश्नांना हात घालायचा हे पण नियोजन महत्वाचे असते. त्यातून किती न येणाऱ्या प्रश्नांची रिस्क घ्यायची हे तुम्हाला सराव केल्याशिवाय समजणार नाही. त्यासाठी A, B, C पद्धत वापरणे सोयीस्कर राहते. A म्हणजे हमखास येणारे उत्तर.. B म्हणजे विचार करून किंवा elimination पद्धत वापरून शोधलेले उत्तर..आणि C म्हणजे ढगात गोळ्या…तर आपली C प्रकारची उत्तरे नसली पाहिजेत किंवा फार कमी असली पाहिजेत.
पूर्व परीक्षेत पास होणे महत्वाचे असते..या परीक्षेला गांभीर्याने घ्या..कारण इथे बऱ्याच मुलांची गाडी अडकते…वारंवार पूर्व देवूनही हे लोक पास होतच नाहीत…हे सातत्याचे अपयश परीक्षापद्धतीतील दोष नसून आपल्या तयारीतील उणीवांचा व सदोष तंत्राचा परिणाम आहे.
अभ्यास आणि तंत्र यांचा मेळ बसला कि हि परीक्षा सहज पार करता येते. म्हणून आत्मविश्वासाने या पूर्व परीक्षेचा अभ्यास करा..आणि सामोरे जा..!!

 

मनापासून शुभेच्छा…!!
विजय अमृता कुलांगे, IAS.
जिल्हाधिकारी, गंजाम, ओडिशा