loading...

पोलिस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांची संघर्षयात्रा - आईच्या कष्टामुळे हे उपनिरीक्षक बणू शकले...!

loading...

मी आज जो काही आहे, तो केवळ माझ्या आईमुळेच, आई तुला शत शत नमन......आज खरोखरच "समाधान' वाटत असल्याची भावना व्यक्त केली आहे, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील पोलिस उपनिरीक्षक समाधान जमदाडे यांच्या आई अनुसया जमदाडे यांनी. अनुसया जमदाडे यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यामुळे शिक्षणाची काय किंमत असते, याची चांगलीच जाणीव त्यांना होती. 1992 मध्ये पती अरुण यांचे निधन झाले. त्या वेळी संसाराची सगळी जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. बालाजी, अर्चना व समाधान अशी तीन मुले त्यांना आहेत. पतीच्या निधनावेळी बालाजी 11, अर्चना नऊ तर समाधान तीन वर्षांचा होता. पती अरुण बॅंकेमध्ये सेक्रेटरीचे काम करत होते. पण, आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी अंगावर आली असतानाही थोडेही न डगमगता अनुसया यांनी अतिशय धीराने आलेल्या परिस्थितीचा सामना केला. 

दररोज मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण करण्यावर त्यांनी भर दिला. दररोज केलेल्या कामाच्या पैशाशिवाय दुसरे काहीच करता येत नव्हते.


मुलांच्या शिक्षणासाठी विहीर खोदण्याचे, शेतात मजुरीचे, रस्ते झाडण्याचे काम न लाजता त्यांनी केले. त्या काळात कुणाचाही साथ मिळत नव्हती. राहायला नीटनेटके घरही नव्हते. त्याही स्थितीत हलाखीचे जीवन जगत मुलांवर चांगले संस्कार केले व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिला. त्याचे आज "समाधान' वाटत असल्याचे अनुसया सांगतात. मोठा मुलगा बालाजी हा पुणे येथे एका खासगी कंपनीत काम करतो आहे. लहान मुलगा समाधान "एमपीएससी'च्या माध्यमातून उत्तीर्ण होऊन तो सध्या पोलिस उपनिरीक्षक म्हणून काम करत आहे. मुलीचे लग्न झाल्याने ती सासरी सुखी आहे. हे सगळे पाहून मनाला "समाधान' मिळत असल्याचेही त्या सांगतात. 

पोलिस उपनिरीक्षक होण्याचा मान काबाडकष्ट करणाऱ्या अनुसयाच्या मुलाने मिळविला याचा त्यांना खूपच अभिमान वाटतो. लोकमंगल समूहाच्या वतीने "आदर्श माता' पुरस्कारानेही त्यांचा सन्मान झाला आहे. सासर किंवा माहेर या दोन्हींचीही साथ न लाभताही "शून्यातून विश्‍व निर्माण' करण्याचे काम अनुसया यांनी केले आहे.

अनुसया जमदाडे म्हणतात, पतीच्या निधनानंतर जराही न खचता खंबीरपणे मनाशी खूणगाठ बांधून मुलांच्या शिक्षणावर भर दिला. त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवली होती. लोक काय म्हणतील, याचा विचार न करता मिळेल ते काम करून मुलांना शिकविले. त्यांच्यावर चांगले संस्कार केले. आज मुले, सुना, नातवंडे असा सर्व सुखी परिवार पाहिल्यानंतर मन आनंदाने भरून येते. मागील दिवस आठवल्यानंतर मात्र मनाला त्रास होतो.

समाधान जमदाडे, पोलिस उपनिरीक्षक, विक्रोळी (मुंबई) पोलिस स्टेशन

वडिलांच्या निधनानंतर स्वतःला सावरत आईने खूपच कष्ट केले. एक दिवसही घरी न बसता तिने काम केले. दहावीचे शिक्षण झाल्यानंतर मोठा भाऊ बालाजीही कामाला जात होता. त्या दोघांनी केलेल्या कष्टामुळे मला शिक्षण घेता आले. "एमपीएससी'ची परीक्षा दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक म्हणून मी विक्रोळी (मुंबई) येथे कार्यरत आहे.

Post a Comment

0 Comments