loading...

विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक

भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्णपदकं मिळवली आहेत. भारताला ही दोन्ही पदकं कुस्तीतच मिळालेली आहेत. बजरंग पुनियानं या स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावलं होतं. 

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक


भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाइल कुस्तीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरत ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. या यशासह विनेश आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू बनली आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत विनेशनं जपानच्या की इरी युकीला ६-२ अशी धूळ चारली. भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्णपदकं मिळवली आहेत. भारताला ही दोन्ही पदक कुस्तीतच मिळालेली आहेत. काल (रविवारी) बजरंग पूनियानं या स्पर्धेतील पहिलं सुवर्णपदक पटकावलं होतं.

सुवर्णपदकासाठीच्या लढतीसाठी विनेश आखाड्यात उतरली तेव्हा तिचा पाय दुखत होता. असं असतानाही तिनं प्रतिस्पर्धी कुस्तीपटूला कोणतीही संधी दिली नाही. या लढतीसाठी विनेशनं काहीशी संथ पण सावध सुरुवात केली. सुरुवातीला तिनं बचावात्मक पवित्रा घेतला होता. मात्र पंचांनी तिला बचावात्मक खेळण्याऐवजी पॉइंट्स मिळव अशी सूचना केल्यानंतर विनेशनं मॅटवर आपली चपळता दाखवत आघाडी मिळवली.

आकड्याबाबत विचार करायचा झाल्यास विनेशनं आपली पहिली आघाडी ४-० अशी घेतली. यानंतर इरी युकीनं २ अंक मिळवले. दरम्यान विनेशनंही २ अंकांची आघाडी मिळवली आणि आपली ४ अंकांची आघाडी कायम ठेवली. शेवटी विनेशनं ६-२नं ऐतिहासिक सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंच. 

अंतिम सामन्यात पोहोचण्यापूर्वी विनेशनं उपांत्य फेरीत कोरियाची कुस्तीपटू किम हिच्यावर मात केली. हा सामना विनेशनं ११-० असा एकतर्फी जिंकत सुवर्णपदकासाठी आव्हान उभं केलं.

भारताकडून दिवसाची सुरुवात करताना विनेशनं चीनच्या सुनला हरवलं. सुनला कोणतीही संधी न देता विनेशनं हा मुकाबला ८-२ असा जिंकला.