loading...

स्वप्ना बर्मन सुवर्णपदक : Asian Games 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत हेप्टॉथ्लॉनमध्ये भारताला पहिलेच सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या स्वप्ना बर्मनने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन हे यश मिळवले आहे. घरची बेताची परिस्थिती असूनही स्वप्नाने जिद्द सोडली नाही. आज सुवर्णपदकाच्या रुपाने तिच्या मेहनतीचे चीज झाले आहे. स्वप्नाचे वडिल रिक्षा ओढण्याचे तर आई चहाच्या मळयामध्ये काम करते. आज आम्ही आनंदी आहोत. मी आणि स्वप्नाच्या वडिलांनी तिच्यासाठी प्रचंड काबाडकष्ट घेतले. आज आमचे स्वप्न साकार झाले. स्वप्नाच्या आईची ही प्रतिक्रियाच सर्वकाही सांगून जाते.


पश्चिम बंगलाच्या जलपायगुरी जिल्ह्यातून आलेल्या या मुलीने देशाचे नाव उज्वल केले आहे. स्वप्नाच्या सुवर्णपदक विजेत्या कामगिरीमुळे आज हेप्टॉथ्लॉन या खेळाचे नाव अनेकांना समजले असेल. हेप्टॉथ्लॉनमध्ये एकूण सात खेळांचा समावेश होतो. तिने दोन दिवसात ६०२६ गुणांची कमाई करुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. पात्रता फेरीमधील पहिल्या दोन (भालाफेक आणि उडी) निकषांमध्ये मोठी आघाडी घेत पहिले स्थान कायम राखल्यानंतर स्वप्नाने ८०० मीटरची शर्यत पूर्ण करून सुवर्णपदकावर नाव कोरले. हेप्टॉथ्लॉन या खेळात अॅथलेटीक्सच्या सात प्रकारांचा समावेश असतो. यामध्ये २०० मी. आणि ८०० मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर १०० मी. अडथळ्याची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी. लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो.

खरंतर स्वप्ना जेव्हा ट्रॅकवर उतरली तेव्हा तिला जबडयामध्ये प्रचंड वेदना होत होत्या. तिला पट्टी बांधून ट्रॅकवर यावे लागले. ती प्रतिस्पर्धी चिनी खेळाडूपेक्षा काही गुणांनी मागे होती. पण स्वप्नाने ही पिछाडी भरुन काढत थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली. स्वप्नाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे तिच्या दोन्ही पायांना मिळून १२ बोटे आहेत. दोन अतिरिक्त बोटांमुळे तिच्या पायाला वेगळया बुटांची गरज आहे. सामान्य बूट तिच्या पायाला फिट बसणारे नाहीत. पण पर्याय नसल्याने ओढून ताणून तिला इतरांसारखेच बूट वापरावे लागायचे. त्यामुळे सरावा दरम्यान प्रचंड त्रास व्हायचा. आता मात्र स्वप्नाने तिच्या पायाच्या गरजेनुसार वेगळे बूट बनवले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.