loading...

रोईंग कॉड्रापल स्कल्स सुवर्णपदक : आशियाई क्रिडा स्पर्धा 2018

आशियाई क्रीडा  स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय नौकानयनपटूंनी धडाकेबाज कामगिरी सुरुच ठेवली आहे. भारताच्या संघाने सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. भारतीय संघाने ६:१७:१३ अशी आश्वासक वेळ नोंदवत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकलं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं सुवर्णपदक ठरलं आहे. भारताच्या दत्तू भोकनळ, स्वर्णसिंह, ओम प्रकाश आणि सुखमित सिंह या चौकडीने भारताला नौकानयनात पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याआधी सकाळच्या सत्रात दुष्यंतने पुरुषांच्या लाईटवेट सिंगल स्कल्स प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. दुष्यंतने ७:१८:७६ अशी वेळ नोंदवली. या प्रकारात कोरियाच्या खेळाडूला सुवर्ण तर हाँग काँगच्या खेळाडूला रौप्यपदक मिळालं. यापाठोपाठ भारताच्या रोहित कुमार – भगवान सिंह जोडीलाही लाईटवेट डबल स्कल्स प्रकारात कांस्यपदक मिळालं.


दुसरीकडे १० मी. एअर पिस्तुल प्रकारात भारताची मनू भाकेर पुन्हा एकदा शर्यतीमधून बाहेर पडली. मात्र भारताच्या हिना सिद्धुने कांस्यपदकाची कमाई करत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं. याचसोबत जलतरण, बॉक्सिंगमध्येही भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. मात्र वेटलिफ्टींग प्रकारात भारताच्या राखी हलदर पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली. 

भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. चार जणांच्या संघामध्ये महाराष्ट्रातील तळेगावच्या दत्तू भोकनळचा समावेश आहे. यंदाच्या एशियाड गेम्समधील हे भारताचं पाचवं सुवर्णपदक ठरलं. दत्तू भोकनळ, स्वर्ण सिंग, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांनी पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स या रोईंग प्रकारात भारताची मान अभिमानाने उंचावली. या संघाने 6.17.13 मिनिटांची वेळ नोंदवली.

रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळत असताना दत्तूची आई आजारी होती. त्याच वर्षी दत्तूवरील मातृछत्र हरपलं. त्यामुळे दत्तू काही काळ निराश होता. एशियाड गेम्समध्ये मेन्स सिंगल स्कल्स प्रकारात आईसाठी सुवर्णपदक जिंकण्याचा त्याचा मानस होता. मात्र सहाव्या स्थानी आल्याने त्याचं पदक हुकलं.

दत्तू हा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला एकमेव रोईंगपटू होता. 27 वर्षांच्या दत्तूने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय रोईंग स्पर्धांमध्ये पदकं कमावली आहेत.