चालू घडामोडी 7 जून 2018

✓केंद्र पुरस्कृत पुनर्रचित राष्ट्रीय बांबू अभियानाला मंत्रिमंडळाची मंजूरी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीकडून 14 व्या वित्त आयोगाच्या  (सन 2018-19 आणि सन 2019-20) उर्वरित कालावधीदरम्यान राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत पुनर्रचित ‘राष्ट्रीय बांबू अभियाना’ला (NBM) मंजुरी मिळाली आहे.
निर्धारित अंमलबजावणी दायित्वानुसार मंत्रालये / विभाग / संस्थांच्या एकत्रीकरणासाठी एक मंच म्हणून हे अभियान विकसित करण्यात आले आहे.


हे अभियान संपूर्ण मूल्य साखळी तयार करून आणि उत्पादक (शेतकरी) आणि उद्योग यांच्यात प्रभावी संपर्क व्यवस्था निर्माण करून बांबू क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करणार. शिवाय बांबू उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी संशोधन आणि विकासावर भर दिला जाईल.

अभियानाबाबत :
14 व्या वित्त आयोगाच्या (सन 2018-19 आणि सन 2019-20) उर्वरित कालावधी दरम्यान अभियान राबवण्यासाठी 1290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यामध्ये केंद्राचा वाटा 950 कोटी रुपये एवढा आहे.या अभियानाचा भर मर्यादित राज्यांमध्ये बांबूच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यावर आहे.

त्यामध्ये विशेषत: ईशान्येकडील राज्ये आणि मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओडिशा, कर्नाटक, उत्तराखंड, बिहार, झारखंड, आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे.

या अभियानामधून 4000 प्रक्रिया/उत्पादन विकास कारखाने स्थापन करणार आणि 1 लक्ष हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र लागवडीखाली आणेल जाणार.

NBM साठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी आणि केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मंजुरीस राज्यांच्या विशेष शिफारशीनुसार वेळोवेळी करण्यात आलेल्या हस्तक्षेपासाठी खर्चाच्या निकषांसह अन्य बदल करण्यासाठी कार्यकारी समितीला अधिकार प्रदान करण्यास देखील मंजुरी दिली गेली.

पुनर्रचित योजनेचे लक्ष्य :
कृषी उत्पन्नाला पूरक म्हणून बिगर वन शासकीय आणि खासगी जमिनीवर बांबू लागवड क्षेत्रात वाढ करणे.

नाविन्यपूर्ण प्राथमिक प्रक्रिया केंद्र स्थापन करणे, प्राथमिक प्रक्रिया करून संरक्षण तंत्रज्ञान आणि बाजारपेठ पायाभूत सुविधा निर्माण करून पीक व्यवस्थापनात सुधारणा करणे.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम पातळीवर उत्पादन विकासाला प्रोत्साहन देणे आणि मोठ्या उद्योगांची पूर्ती करणे.

कौशल्य विकास, क्षमता निर्मिती आणि बांबू क्षेत्राच्या विकासाबाबत जागरूकता निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे.

या योजनेमुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात शेतकरी तसेच  स्थानिक कारागीर आणि बांबू क्षेत्राशी संलग्न उद्योगातील कामगारांना लाभ मिळणार. सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र बांबू लागवडीखाली आणण्याचा यावेळी प्रस्ताव आहे. लागवडीमुळे सुमारे एक लाख शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे.

बांबू लागवडीमुळे कृषी उत्पादकता आणि शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल आणि उद्योगांना गुणवत्तापूर्ण सामुग्री मिळेल. यामुळे कुशल आणि अकुशल दोन्ही क्षेत्रात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्यास मदत होईल.

✓नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-2016: ईशान्येकडील तीन राज्यांकडून निषेध :
• भारत सरकारच्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक-2016’ याचा ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालँड या तीन राज्यांकडून निषेध केला गेला आहे.

• या राज्यांमधील विद्यार्थी संघांच्या सर्वोच्च संघटनांकडून आपापल्या राज्यात या प्रस्तावित विधेयकाला तात्काळ मागे घेण्याची मागणी केली जात आहे.

मुद्दा काय आहे :
• 1955 सालच्या कायद्यानुसार, कोणत्याही ‘अवैध स्थलांतरित’ व्यक्तीला भारतीय नागरिकत्व दिली जाऊ शकत नाही. या कायद्यांतर्गत ‘अवैध स्थलांतरित’ याच्या व्याख्येत दोन प्रकारचे लोक येतात. पहिले म्हणजे ते परदेशी जे विना वैध पारपत्र (पासपोर्ट) किंवा अन्य आवश्यक दस्तऐवजांशिवाय भारतात दाखल झाले आहेत आणि दुसरे ते परदेशी जे व्हिसाची मुदत संपल्यानंतर देखील भारतात आहेत.

• नागरिकत्व अधिनियम-1955 मध्ये दुरुस्तीसाठी लोकसभेत ‘नागरिकत्व (दुरूस्ती) विधेयक-2016’ मांडले गेले. या विधेयकाचा उद्देश म्हणजे भारतात 6 वर्ष वास्तव्य केल्यानंतर अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांमधून अवैध स्थलांतरित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या लोकांना भारताच्या नागरिकत्वासाठी पात्र ठरवणे, हा आहे.

विधेयकाची वैशिष्ट्ये :
• जुलैमध्ये मांडल्या गेलेल्या दुरूस्ती विधेयकात ‘अवैध स्थलांतरित’ याच्या व्याख्येत बदल करत असे म्हटले गेले आहे की अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांमधून अवैध स्थलांतरित हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायांच्या लोकांना ‘अवैध स्थलांतरित’ मानले जाणार नाही.

• ज्या लोकांचा नवा विधेयक ‘अवैध स्थलांतरित’च्या व्याख्येत समावेश होत नाही, अश्या लोकांना देशीकरणाच्या (naturalisation) माध्यमातून भारतीय नागरिकत्व प्राप्त करण्यामध्ये सूट दिली जाते. जुन्या कायद्यान्वये या प्रक्रियेमधून नागरिकत्वासाठी अर्ज तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा एखादी परदेशी व्यक्ती 12 वर्षांपासून भारतात वास्तव्य करीत असेल, मात्र नव्या विधेयकात ही काळमर्यादा तीन देशांच्या निश्चित सहा धर्माशी संबंधीत लोकांसाठी कमी केली गेली असून ती केवळ सहा वर्षे इतकी केली आहे.

• विधेयकानुसार समुद्रापलीकडील भारतीय नागरीक (OCI) कार्डधारकांची नोंदणी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाल्यास रद्द केली जाऊ शकते. उदा. पार्किंग क्षेत्र नसलेल्या ठिकाणी पार्किंग करणे अश्या क्षुल्लक करणांसारख्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल OCI नोंदणी रद्द करण्यास परवानगी देते.

✓चीनच्या ‘गाओफेन-6’ उपग्रहाचे यशस्वी उड्डाण :
चीनने पृथ्वीच्या वातावरणाच्या व्यापक निरीक्षणासाठी ‘गाओफेन-6’ नावाचा उपग्रह अवकाशात पाठवला आहे. चीनचे मुख्य प्रक्षेपक ‘लॉन्गमार्च-2D’ याच्या सहाय्याने हा उपग्रह पाठवण्यात आला.

‘गाओफेन-6’ हा उपग्रह प्रामुख्याने कृषी संसाधनांचे संशोधन आणि आपत्ती देखरेख यासाठी वापरला जाईल. सोबतच वैज्ञानिक प्रयोगासाठी ‘लुओजीया-1’ नावाचा एक उपग्रह पाठविण्यात आला आहे. 

✓पेद्रो संचेझ: स्पेनचे नवे पंतप्रधान :
पेद्रो संचेझ यांनी स्पेनचे पंतप्रधान पद सांभाळलेले आहे. ते पहिलेच पंतप्रधान आहेत, की ज्यांनी पदाची शपथ बायबल विना घेतली. 46 वर्षीय संचेझ हे स्पेनचे सातवे पंतप्रधान आहेत.

मारियानो रखॉय यांच्या जागी संचेझ यांनी पंतप्रधान पदाचा भार सांभाळला आहे. संचेझ स्पेनच्या सोशलिस्ट पार्टीचे प्रमुख आहेत.

स्पेन हा एक युरोपीय देश आणि युरोपीय संघाचा एक सदस्य राष्ट्र आहे. हा युरोपच्या आग्नेय दिशेला इबेरियन द्वीपकल्पावर आहे. या देशाची राजधानी माद्रिद हे शहर आहे आणि युरो हे राष्ट्रीय चलन आहे.

✓अब्देल फतेह अल-सिसी: इजिप्तचे राष्ट्रपती (दुसरा कार्यकाळ) :
इजिप्तचे वर्तमान राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी यांनी 2 जून 2018 रोजी पुन्हा एकदा राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. दुसऱ्या कार्यकाळाच्या चार वर्षाच्या मुदतीसाठी ही शपथ घेतली गेली आहे.

इजिप्त हा उत्तर-पूर्व आफ्रिका आणि मध्य-पूर्व प्रदेशाला जोडणारा देश आहे. कैरो हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि इजिप्तीयन पाउंड हे चलन आहे.

✓एम. वेंकटेश: मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनीचे MD व CEO :

एम. वेंकटेश यांनी मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. वेंकटेश यांनी एच. कुमार यांच्या जागी हा पदभार सांभाळला आहे.

मंगळूर रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स कंपनी ही शासकीय ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्प (ONGC)च्या मालकीची एक उपकंपनी आहे

काही महत्वाच्या घटना:
२००६ अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.
२००४ शिरोमणी अकाली दल (लोंगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
२००१ युनायटेड किंग्डममधील निवडणुकांत टोनी ब्लेअरच्या नेतृत्त्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत
१९९४ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ञ प्रभाकर नार्वेकर यांची नियुक्ती. या पदावर प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
१९७९ रशियातील कापुस्तिन यार येथुन ’भास्कर-१’ या दुसर्‍या भारतीय उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.
१९७५ क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमधे सुरूवात झाली.
१९६५ अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.
१८९३ महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

जन्म :
१९८१ अ‍ॅना कुर्निकोव्हा – रशियन लॉन टेनिस खेळाडू
१९७४ महेश भूपती – भारतीय लॉन टेनिस खेळाडू
१९४२ मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (मृत्यू: २० आक्टोबर २०११)
१९१७ डीन मार्टिन – अमेरिकन गायक, संगीतकार व निर्माते (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)
१९१४ ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास – दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार (मृत्यू: १ जून १९८७)
१९१३ मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष – लेखक व टीकाकार (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)
१८३७ अ‍ॅलॉइस हिटलर – अ‍ॅडॉल्फ हिटलरचे वडील (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

मृत्यू :
२००२ बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. पाच महिने ते हंगामी राष्ट्रपती होते. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)
२००० गोपीनाथ तळवलकर – बालसाहित्यिक, ’आनंद’ मासिकाचे संपादक, आकाशवाणीच्या ’बालोद्यान’ कार्यक्रमातील ’नाना’ (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)
१९७० इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (जन्म: १ जानेवारी १८७९)
१९९२ डॉ. सखाराम गंगाधर मालशे – लेखक, समीक्षक व संपादक. त्यांनी एकोणिसाव्या शतकावर लिहिलेली ’गत शतक शोधताना’ आणि ’तारतम्य’ ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. डॉ. धनंजय कीर यांच्या साहाय्याने त्यांनी ’महात्मा फुले समग्र वाङ्‍मय’ संपादित केले आहे.  (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)
१९५४ अ‍ॅलन ट्युरिंग – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ (जन्म: २३ जून १९१२)

Post a Comment

0 Comments