चालू घडामोडी 13 जून 2018

✓ एच. आर. खान - बंधन बँकेचे अध्यक्ष :
बंधन बँकेने हरुन रसिद खान यांची गैर-कार्यकारी, अंशकालिक अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.

एच. आर. खान हे माजी RBI डेप्युटी गव्हर्नर आहेत. ही नवी नियुक्ती 5 जून 2018 पासून तीन वर्षांपर्यंत किंवा स्वतंत्र संचालक पदाचा कार्यकाळ संपेपर्यंत असेल.

✓ तरुण भारतीय उद्योजकांनी $1 दशलक्षचा 'वुमन्स सेफ्टी एक्सप्राइज' पुरस्कार जिंकला :
IIT दिल्ली आणि दिल्ली टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीच्या तरुण भारतीय उद्योजकांनी महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात त्यांच्या ‘सेफर प्रो’ या प्रकल्पासाठी $1 दशलक्षचा 'वुमन्स सेफ्टी एक्सप्राइज' पुरस्कार जिंकला आहे.

भारतीय-अमेरिकी समाजसेवी अनु व नवीन जैन यांनी नवी दिल्लीमधील ‘लीफ वेअरेबल्स’ या स्टार्टअप कंपनीच्या माणिक मेहता, निहारिका राजीव आणि अविनाश बन्सल यांना हा पुरस्कार दिला आहे. त्यांनी अंगावर घालण्यासारखे एक स्मार्ट उपकरण विकसित केले आहे, जे स्त्रियांना संकटकाळात मदत मिळवण्यासाठी एक आपत्कालीन सुचना पाठविण्यासाठी मदत करते.

✓ कामिला शामीसी ह्यांच्या ‘होम फायर’ कादंबरीला ‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ :
ब्रिटीश-पाकिस्तानी लेखिका कामिला शामीसीह्यांच्या ‘होम फायर’ शीर्षक असलेल्या कादंबरीला ‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ प्राप्त झाला आहे.

‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ हा ग्रेटब्रिटनमधील सर्वात प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांपैकी एक आहे. कोणतेही राष्ट्रीयत्व असलेल्या स्त्री लेखकाला इंग्रजीमध्ये लिहिलेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 30,000 पाउंड रोख रकमेच्या या पुरस्काराची स्थापना सन 1996 मध्ये झाली. हा पुरस्कार ‘विमेन्स प्राइज फॉर फिक्शन’ या संस्थेकडून दिला जातो.

✓भारत आणि SCO: संधी आणि आव्हाने :
8-9 जून 2018 रोजी चीनच्या किंगदाओ शहरात शांघाय सहकार संघटना (SCO) याची वार्षिक शिखर परिषद संपन्न झाली. या परिषदेत चीन आणि भारत यांच्यातल्या संबंधांना चालना मिळणार्या अनेक विषयांवर चर्चा दोन्ही देशांनी केली आणि म्हणूनच अलीकडेच दोन्ही देशांमधील विवादपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा अधिक महत्त्वाची ठरते.

आधी आपण शांघाय सहकार संघटना (SCO) बाबत जाणून घेऊयात :
शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली करण्यात आली. याचे मुख्यालय बीजिंग, चीनमध्ये आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.  चीन हा SCO चा संस्थापक आहे. भारत 2017 साली SCO चा पूर्ण सदस्य बनला.

परिषदेदरम्यान चर्चित मुद्दे :

परिषदेत भारताने दहशतवादी जाळ्याच्या विरोधात एकत्रितपणे क्षेत्रीय आणि वैश्विक लढा देण्यासाठी प्रयत्न करण्यावर आणि व्यापार वाढविण्यावर भर दिला.

भारताकडून SCO च्या सदस्य देशांमध्ये व्यापार वाढवण्यासाठी प्रादेशिक संपर्क प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले गेले. भारताने इराणमधील चबाहर बंदर प्रकल्प आणि संसाधन-समृद्ध मध्य आशियाई देशांमध्ये प्रवेश मिळवून देण्यार्या 7200 किलोमीटरहून अधिक लांबीच्या आंतरराष्ट्रीय उत्तर-दक्षिण परिवहन मार्गिका यासारख्या संपर्क जोडणी प्रकल्पांवर भर दिला.

गेल्या वर्षी $51 अब्जपर्यंत पोहोचलेली व्यापारी तूट भरून काढण्यासाठी भारताने चीनला त्याचे माहिती तंत्रज्ञान आणि औषधीनिर्माण क्षेत्र खुले करण्यास विनंती केली आहे.

यावर्षी दहशतवाद, अतिरेकी आणि क्रांतिकारकतेविरुद्धच्या लढ्यात सहकार्य करण्यासंदर्भात मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला गेला.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर (PoK) येथून चालवलेल्या दहशतवादी संरचनेचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्याच्या हेतूने भारताने विविध बहुपक्षीय मंचांसमोर पाकिस्तान-प्रायोजित दहशतवादाचा मुद्दा मांडला आहे.

SCO ला सर्वात मोठा क्षेत्रीय व्यापारी संघ मानल्या जात आहे. या संघामुळे आशियात आर्थिक वृद्धीला बळकटी प्राप्त होणार. याचा भारताला असा फायदा म्हणजे की, विकासासाठी राजकीय संबंध आणि सुरक्षा अधिक महत्त्वाची असते. त्यासाठी सामंजस्य असणे गरजेचे ठरते. SCO च्या माध्यमातून भारताला आपल्या शेजारी देशांसोबतचे संबंध सुधारण्यास मदत होईल आणि देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार. मात्र वाढती राजकीय अस्थिरता ही अजून एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. त्यासाठी यामार्गे प्रयत्न केले जाईल.

✓ CSIRच्या संशोधकांनी लिथियम आयन बॅटरीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले :
तामिळनाडूच्या कराईकूडी स्थित CSIR-केंद्रीय विद्युत-रसायन संशोधन संस्था (CSIR-CECRI)येथील संशोधकांनी लिथियम आयन (Li-ion) बॅटरीचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आहे.

या तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी CSIR-CECRI आणि RAASI सोलर पॉवर प्रा. लिमि. यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. RAASI समूह तमिळनाडूतील कृष्णागिरी जिल्ह्यात बेंगळुरूच्या नजीक आपला निर्मिती कारखाना उभारणार आहे.

वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) ही भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. याची स्थापना 26 सप्टेंबर 1942 रोजी करण्यात आली. याच्या देशभरात 39 प्रयोगशाळा (ज्यात 5 क्षेत्रीय संशोधन प्रयोगशाळा) आणि 50 क्षेत्रीय केंद्रे आहेत.

✓ पूरस्थितीचा अंदाज घेण्यासाठी IMD प्रथमच ‘फ्लॅश फ्लड मार्गदर्शन प्रणाली’ वापरणार :
पूर अंदाज आणि प्रतिबंधात्मक तंत्राबाबत आपत्ती व्यवस्थापन संस्थांना मार्गदर्शन पुरविण्यासाठी भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) देशात प्रथमच ‘फ्लॅश फ्लड मार्गदर्शन प्रणाली’ उपयोगात आणणार आहे.

भारत हवामानशास्त्र विभाग (IMD) भारत सरकारच्या भूशास्त्र मंत्रालयाची एक संस्था आहे. याची स्थापना सन 1875 मध्ये हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड यांनी केली. IMD चे मुख्यालय नवी दिल्लीत आहेत.

✓ DDCA ला BCCI कडून 'एकूणच सर्वोत्कृष्ट कामगिरी’ पुरस्कार जाहीर :
• दिल्ली व जिल्हा क्रिकेट संघ (DDCA) याला भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडून (BCCI) दिला जाणारा 'एकूणच सर्वोत्कृष्ट कामगिरी’ पुरस्कार (Best Overall Performance Award) जाहीर झाला आहे.

• DDCA ला हा पुरस्कार त्यांच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ (पुरुष व महिला दोन्ही गटांमध्ये) संघांनी प्रदर्शित केलेल्या सतत कामगिरीसाठी दिला जाणार आहे.

• शिवाय, DDCA चे खेळाडू तेजस बरोका आणि जॉन्टी सिद्धू यांना अनुक्रमे सर्वाधिक बळी घेणारा (23 वर्षांखालील) आणि सर्वाधिक धावा काढणारा (19 वर्षांखालील) खेळाडू म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

सुनील पोरवाल गृह विभागाचे अपर मुख्य सचिव :
राज्य सरकारने 11 जून रोजी 12 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांची नेमणूक महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. तर उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या बदली श्रीवास्तव यांच्या जागी करण्यात आली आहे.

पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांची उद्योग विभागात, तर वित्त विभागाच्या (सुधारणा) अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांची शालेय शिक्षण खात्यात बदली झाली आहे.

शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांची सामान्य प्रशासन विभागात (राजशिष्टाचार) नेमणूक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष प्रकल्पासाठी म्हणून नेमणूक करण्यात आलेले प्रधान सचिव अनिल डिग्गीकर यांची बदली पर्यावरण विभागात झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची बदली वंदना कृष्णा यांच्या जागी वित्त विभागात करण्यात आली आहे.

सुहासिनीदेवी घाटगे यांना कोरगावकर पुरस्कार जाहीर :
कोल्हापूर येथील स्वयंसिध्दा संस्थेचा 26 वा वर्धापनदिन 15 जून रोजी विविध उपक्रमांनी साजरा होणार आहे. यंदाचा (कै) स्मिता कोरगावकर पुरस्कार श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांना दिला जाणार आहे.

कागल परिसरातील महिला सक्षमीकरण आणि दिव्यांगांसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांचा गौरव होणार आहे. दरम्यान, शाहू स्मारक भवनात दुपारी तीन वाजता पुरस्कार वितरण सोहळा होईल.

डॉ. शोभना तावडे-मेहता आरोग्यम्‌ धनसंपदा पुरस्कार डॉ. विनोद घोटगे यांना दिला जाणार आहे. डॉ. घोटगे यांनी आरोग्य सेवा बजावताना विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.

लेखक डॉ. सागर देशपांडे यांना मधुकर सरनाईक परिवर्तन दूत तर रजनी आणि अप्पासाहेब पाटील यांना (कै) माई तेंडूलकर यांच्या स्मरणार्थ मातृपितृ देवोभव पुरस्कार दिला जाईल. जन्मतःच अपंग असलेल्या मीनाक्षी पाटील यांचे हे आई-वडिल असून मीनाक्षी यांना पाटील दांपत्यांने पदवीधर बनवून स्वेटर उद्योगात उभे केले आहे.

मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार महेश सुतार यांना दिला जाणार असून महेश कर्णबधीर, मतीमंद, गतीमंद मुलांना पंक्‍चर व सर्व्हिसिंगची कामे शिकवून स्वावलंबी बनवत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली किम जोंग यांची भेट :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 12 जून रोजी सकाळी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची भेट घेतली असून उत्तर कोरियाने अण्वस्त्र नष्ट करावी यासाठीची ही शिखर बैठक कोरियन युद्धाचा शेवट करणारी ठरणार आहे.

हस्तांदोलन करत या नेत्यांनी बैठकीला सुरुवात केली. दक्षिण कोरियाचे अमेरिकेतील माजी राजदूत सुंग किम हे अमेरिकेच्या बाजूने चर्चेची सूत्रे सांभाळणार आहेत. तर उत्तर कोरियाचे उपपरराष्ट्रमंत्री चो सन हुई हे उत्तर कोरियाची सूत्रे सांभाळणार आहेत. सुरुवातीला ट्रम्प व किम हे आमनेसामने भेटतील व नंतर चर्चा पुढे जाईल.

सिंगापूरमधील सेनटोसा बेटावर सकाळी नऊ वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सहा वाजता) डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग यांच्यात शिखर परिषदेला सुरुवात झाली.

CSC च्या भागीदारीसह दूरसंचार विभागाने 5,000 वाय-फाय चौपाल सुरू केल्या :
सामान्य सेवा केंद्र (CSC) च्या भागीदारीसह दूरसंचार विभागाने 5,000 वाय-फाय चौपाल कार्यरत केल्या आहेत, जे ग्रामीण भागात इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी 60,000 वाय-फाय हॉटस्पॉट प्रदान करतील.

या प्रसंगी, ट्रेन तिकिटा आरक्षित करण्यासाठी IRCTC आणि CSC ई-गव्हर्नन्स यांच्यात एक करार झाला. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ग्रामीण भागात शासकीय सेवा पुरवण्यासाठी ग्राम-उद्योजकांकडून चालविलेल्या जाणार्‍या देशभरातली सर्व 2.9 लक्ष सामान्य सेवा केंद्रांवर (CSC) बँकांचे विस्तारित काऊंटर उघडण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

रक्तपेढींचे 'ब्लड सेंटर' म्हणून नामांतर करण्याचा केंद्र शासनाचा प्रस्ताव :
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून देशभरातल्या रक्तपेढींचे (म्हणजेच ‘ब्लड बँक’) 'ब्लड सेंटर (किंवा रक्त केंद्र)' म्हणून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नामांतरणाचा हा निर्णय आंतरराष्ट्रीय नाम-नियमांनुसार घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘ब्लड बँक’ या शब्दांचा उपयोग होत नाही, त्यांना ‘ब्लड सेंटर’ म्हणून ओळखले जाते.

काही महत्वाच्या घटना :
२००० स्पेनमधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुध्द खेळतांना ग्रॅडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला, तर तीन लढती अनिर्णित राखण्यात यश मिळविले. या लढती तीन तास सुरु होत्या.
१९९७ दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमागृहाला लागलेल्या आगीत ५९ जण मृत्यूमुखी पडले तर सुमारे १०० जण जखमी झाले.
१९८३ पायोनिअर-१० हे मानवविरहित अंतराळयान नेपच्यूनची कक्षा ओलांडून आपल्या सूर्यमालेच्या पलीकडे जाणारे पहिले यान ठरले.
१९७८ इस्त्रायली सैन्याने लेबनॉनमधुन माघार घेतली.
१९५६ पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९३४ अ‍ॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची इटलीतील व्हेनिस येथे भेट झाली.

जन्म :
१९२३ प्रेम धवन – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, ’ए मेरे प्यारे वतन’ फेम (मृत्यू: ७ मे २००१ - मुंबई)
१९०९ इ. एम. एस. नंबूद्रीपाद – केरळचे मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: १९ मार्च १९९८)
१९०५ कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (मृत्यू: ५ डिसेंबर १९५९ - मुंबई)
१८७९ गणेश दामोदर तथा 'बाबाराव' सावरकर – कट्टर हिंदुत्त्ववादी आणि ’अभिनव भारत’ संघटनेचे संस्थापक (मृत्यू: १६ मार्च १९४५)
१८३१ जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ (मृत्यू: ५ नोव्हेंबर १८७९ - केम्ब्रिज, यु. के.)
१८२२ कार्ल श्मिट – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९४)

मृत्यू : 
२०१२ ’गझलसम्राट’ मेहदी हसन – पाकिस्तानी गझलगायक (जन्म: १८ जुलै १९२७)
१९६९ प्रल्हाद केशव तथा आचार्य अत्रे – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते (जन्म: १३ ऑगस्ट १८९८)
१९६७ विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री (१९६४) (जन्म: २ आक्टोबर १८९१)

Post a Comment

0 Comments