loading...

चालू घडामोडी 10 जून 2018

loading...
✓एशियन्स गेम्ससाठी भारतीय फुटबॉल संघ पात्र :
एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय पुरुष फुटबॉल संघ पात्र ठरला आहे. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने फुटबॉल संघाला हिरवा कंदिल दाखवला आहे. यासोबतच हॅण्डबॉल संघही पात्र ठरला आहे.

फुटबॉल आणि हॅण्डबॉल दोन्ही संघ अत्यंत चांगली प्रगती करत असून त्यांना संधी मिळाली पाहिजे असं इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितलं आहे.

'फुटबॉल संघ प्रगती करत आहे. फुटबॉल संघ सध्या 16 व्या क्रमांकावर असून चांगली कामगिरी करत तो 10 व्या क्रमांकावर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे पुरुष संघाला पात्र ठरवण्यात आले आहे', असंही ते म्हणाले आहेत. हॅण्डबॉल संघाबाबात बोलताना, ते सध्या 12 व्या क्रमांकावर असून अजून चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितले.

जिम्नॅस्टिक संघाची निवड करण्यासाठी इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने पाच सदस्यीय निवड समिती गठीत केली आहे. याशिवाय घोडेस्वारी संघाला न पाठण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवडीवरुन झालेल्या वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.

तसेच जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडियाने निवड समितीची पाच नावांची शिफारस केली असून इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनने ती मान्य केली आहेत.

✓ जुजेपी कोंटे इटलीचे नवे पंतप्रधान :

जुजेपी कोंटे यांनी 8 जून रोजी इटलीचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. आघाडी सरकारचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोंटे हे पतंप्रधानपदी विराजमान झाले असून आजच्या शपथविधीनंतर गेल्या काही महिन्यांपासून इटलीत सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेलाही पूर्णविराम मिळाला आहे.

नवे सरकार स्थापन झाल्यामुळे इटलीत फेरनिवडणुका टळल्या आहेत. कोंटे हे शिक्षणतज्ञ असून त्यांचा राजकारणातील अनुभव अगदीच तोकडा आहे. त्यामुळे ते सरकारचा गाडा कसा हाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

✓बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नि-5 चे यशस्वी प्रक्षेपण :
ओदिशातील बालासोर येथून स्वदेशी क्षेपणास्त्र अग्नि 5 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. लांब पल्ला गाठण्याची क्षमता असलेल्या या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रावरून अणवस्त्रे वाहून नेता येऊ शकतात. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5 हजार किमी इतकी असून ते डॉ. अब्दुल कलाम बेटावरून लाँच करण्यात आले. हे आतापर्यंतचे सर्वाधिक आधुनिक क्षेपणास्त्र आहे.

 हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरून मारा करू शकते. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीत असलेल्या कलाम बेटाच्या इंटिग्रेटेड टेस्ट रेंजच्या पॅड 4 वरून हे क्षेपणास्त्र लाँच करण्यात आले. अग्नि 5 ची ही सहावी चाचणी ठरली. चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राने अपेक्षित अंतर गाठले.

 सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंतच्या अग्नि 5 च्या तुलनेत सर्वाधिक आधुनिक आहे. हे नेव्हिगेशन आणि दिशा दर्शक, वॉरहेड आणि इंजिनसंबंधी नवीन तंत्रज्ञानांनी युक्त आहे. हायस्पीड कॉम्प्युटर आणि कोणतीही कमतरता सहन करण्याची क्षमता असलेले सॉफ्टवेअरबरोबर रोबस्टच्या साहाय्याने क्षेपणास्त्राचे यशस्वी लाँचिंग होण्यास मदत झाली.

✓QSच्या 2019 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या क्रमवारीत 24 भारतीय विद्यापीठांचा समावेश :
• ब्रिटनमध्ये प्रकाशित ‘क्वॅकुएरेली सायमन्ड्स (QS) वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2019’ मध्ये 24 भारतीय विद्यापीठांचा समावेश झाला आहे.

• भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई (IIT-Bombay) 48.2 गुणांसह (100 पैकी) भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. ते यावर्षी जगातील 1000 सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या या यादीत गेल्या वर्षीच्या 179 व्या क्रमांकावरुन थेट 162 व्या स्थानावर आले आहे.

• अमेरिकेचे मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (MIT) ने सलग सातव्या वर्षी यादीत अव्वल स्थान पटकावले त्यानंतर अनुक्रमे स्टॅनफोर्ड विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) यांचा क्रमांक लागतो.

• आशियामध्ये, सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठ (11), नानयांग टेक्नोलॉजीकल विद्यापीठ, सिंगापूर (12) आणि त्सिंगगुआ विद्यापीठ, चीन (17) हे अव्वल ठरले आहेत. प्रथम 500 मध्ये IIT बॉम्बेसोबतच IISc बेंगळुरू (170) आणि IIT दिल्ली (172), IIT मद्रास (264), IIT कानपूर (283), IIT खरगपूर (295), IIT रुरकी (381), IIT गुवाहाटी (472) आणि दिल्ली विद्यापीठ (487) यांना स्थान मिळाले आहे.

✓ उत्कृष्ठ जलसिंचनाबद्दल पांडुरंग शेलार यांचा गौरव :
खडकवासला धरणातील उपलब्ध पाण्याचे शहरांसाठी पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करून वर्षभरात ग्रामीण भागातील चार तालुक्यात नियोजन करून सहा आवर्तन दिले. तर त्यातील दोन आवर्तने ही उन्हाळ्यात दिली आहे. त्याबाबद्दल, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांचा जलसंपदा विभागामार्फत खात्याचे सचिव सी.ए.बिराजदार यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले.
 खडकवासला कालव्याच्या निर्मीतीनंतर प्रथमच 2017-18 या पावसाळी वर्षात पुणे शहराच्या 40 लाख लोकसंख्येला व्यवस्थित मुबलक पाणी पुरवठा

दिला. त्याचबरोबर, ग्रामीण भागात शेतीसाठी व पिण्यासाठी हवेली, दौड, इंदापूर, बारामती या चार तालुक्यांमध्ये एकूण सहा सिंचन आवर्तने दिली.

 सिंचनाचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे या वर्षात कालव्यातून उन्हाळी दोन आवर्तने शेतक-यांसाठी दिली गेली. तसेच, उत्कृष्ट सिंचन व्यवस्थापन, व पाणीपट्टी वसूलीमध्ये सन 2017-18 मध्ये केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल शेलार यांचा सत्कार करण्यात आला आहे.

✓दक्षिण आफ्रिकेच्या पीटरमॅरिट्झबर्गमध्ये ‘मंडेला-गांधी युवा’ परिषद आयोजित :
दक्षिण आफ्रिकेतील पीटरमॅरिट्झबर्ग शहरात 7 जून 2018 रोजी तीन दिवस चालणार्‍या ‘मंडेला-गांधी युवा’ परिषदेला सुरुवात झाली.

125 वर्षांपूर्वी 7 जून 1893 रोजी तरुण भारतीय वकील मोहनदास करमचंद गांधी यांना ब्रिटिश काळात गोर्‍या लोकांसाठी आरक्षित असलेल्या ट्रेन डब्ब्यामधून बळजबरीने बाहेर काढण्यात आले. या ऐतिहासिक घटनेच्या स्मृतीत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेमधील प्रसिद्ध शांतीदूत नेल्सन मंडेला (ऊर्फ मदिबा) आणि भारतीय महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा आणि शांती या तत्वांवर जगभरातील भेदभावाच्या समस्यांवर उपाय शोधण्याकरिता या परिषदेत चर्चा केली जात आहे.

✓लघुकालीन अनुदानित पीक कर्ज योजना DBT मार्गे राबवली जाणार :
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) निर्णयानुसार, चालू म्हणजेच वित्त वर्ष 2018-19 पासून 3 लाख रुपयांपर्यंतच्या लघुकालीन पीक कर्जासंदर्भात व्याज अनुदान योजना थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे.

लघुकालीन पीक कर्जांसाठी व्याजावरील अनुदानासाठी केंद्र शासनाने सन 2018-19 साठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि उत्तर-पूर्व क्षेत्र यासंदर्भात नियोजित पद्धतीनुसार या योजनेची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

लघुकालीन अनुदानित पीक कर्ज योजनेमधून शेतकर्‍यांना 7% इतक्या अनुदानित व्याज दराने 3 लक्ष रुपयांपर्यंत कर्जाचा लाभ घेता येतो, ज्यामुळे त्याची परतफेड 4% च्याही खाली जाऊ शकते.

✓आरोग्य क्षेत्रात सहकार्य विस्तारित करण्यासाठी भारत आणि नॉर्वे यांच्यात सामंजस्य करार :
आरोग्य क्षेत्रात सहकार्य विस्तारित करण्यासाठी भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नॉर्वे सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासोबत एक सामंजस्य करार केला आहे.

सन 2018 ते सन 2020 या तीन वर्षांच्या कालावधीत राबविण्यात येणार्‍या नॉर्वे-भारत भागीदारी पुढाकार (NIPI) या कार्यक्रमाच्या तृतीय टप्प्यात समान हेतू असलेल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले जाईल आणि एक इनोव्हेशन हब स्थापन केले जाईल. या कार्यक्रमाचा प्रथम टप्पा सन 2006-2012 आणि द्वितीय टप्पा सन 2012-2017 या कालावधीत पूर्ण करण्यात आला.

✓ ‘कृषी कल्याण’ अभियान :
• कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ‘कृषी कल्याण’ अभियान सुरु केले आहे.

• 2022 सालापर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने घेतलेल्या पुढाकारांचा एक भाग म्हणून हे अभियान 1 जून ते 31 जुलै 2018 या कालावधीत चालवले जाणार आहे.

• हे अभियान NITI आयोगाच्या निर्देशानुसार ग्रामविकास मंत्रालयाशी सल्लामसलत करून प्रत्येक निवडक महत्वाकांक्षी जिल्ह्यांमधील 25 खेड्यांमध्ये (1000 लोकसंख्यापेक्षा अधिक असलेले) चालवले जाणार आहे.

• शेतकी तंत्रज्ञानात सुधारणा कशी करता येईल आणि उत्पन्न कसे वाढवता येणार याबाबत शेतकर्‍यांना मदत आणि सल्ला देण्यासाठी हे अभियान चालवले जात आहे.

✓नील ध्वज मानक प्रकल्पात राज्यातील बंदरांचा समावेश :
• देशातील तेरा बंदरे नील ध्वज प्रमाणन मानकानुसार(ब्लू फ्लॅग स्टँडर्डस) नुसार विकसित केली जाणार असून त्यामुळे पर्यटकांना जास्त आनंददायी अनुभव घेता येणार आहे. या तेरा बंदरात महाराष्ट्रातील चिवला व भोगवे या दोन बंदरांचा समावेश करण्यात आला आहे.

• या शिवाय  गोवा, पुडुचेरी,दमण व दीव, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार येथील प्रत्येकी एकेका बेटाचा ब्लू फ्लॅग बीच म्हणून विकास केला जाणार आहे. ओदिशातील कोणार्क किनाऱ्यावरील चंद्रभागा बंदराला 5 जूनला पर्यावरण दिनी गौरवण्यात येणार आहे. या बंदराने ब्लू फ्लॅग बीच निकष पूर्ण केले आहेत. ही सगळी बंदरे भारतातच नव्हे तर आशियातील पहिली असणार आहेत.

 सोसायटी फॉर इंटिग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट या संस्थेच्यावतीने भारतीय बंदरे विकसित केली जातात. या प्रकल्पाचे प्रमुख अरविंद नौटियाल यांनी सांगितले की, ही बंदरे पर्यटक स्नेही केली जाणार असून तेथे स्वच्छता, प्लास्टिक मुक्ती यावर भर दिला जाणार आहे. तेथे कचरा व्यवस्थापन प्रणालीही बसवण्यात येणार आहे. या बंदरांना पर्यावरण व पर्यटन विषयक तेहतीस निकष पूर्ण करावे लागणार आहेत.

 ब्लू फ्लॅग बीच मानके 1985 मध्ये कोपनहेगनच्या फाऊंडेशन फॉर एनव्हरॉनमेंटल एज्युकेशन या संस्थेने त्यार केली आहेत. यात मत्स्य अधिवास सुरक्षित करतानाच प्रदूषणाला आळा घालणे, पर्यटक सुविधांना प्राधान्य देणे हे निकष महत्त्वाचे आहेत.

न्यूझीलंडचे प्रशिक्षक माइक हेसन यांचा राजीनामा :
न्यूझीलंड क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 6 वर्ष न्यूझीलंडच्या संघासोबत काम केल्यानंतर हेसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली.

कुटुंबियांसोबत वेळ घालवता यावा यासाठी हेसन यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. सध्यातरी कोणत्याही अन्य संघासोबत काम करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. मी माझ्या कामात 100 टक्के योगदान देऊ शकत नाही. माझ्या कामासोबत मी आता न्याय करु शकत नाही, पत्नी आणि मुलीसोबत वेळ व्यतीत करणार असल्याचं हेसन यांनी सांगितलं.

पुढील वर्षी होणाऱ्या विश्व चषकापर्यंत हेसन यांनी संघासोबत कायम राहावं यासाठी न्यूझीलंड क्रिकेट मंडळाकडून प्रयत्न करण्यात आले, पण हेसन यांनी त्यास नकार दिला. त्यावर न्यूझीलंड क्रिकेट मंडळानेही त्यांच्या निर्णयाचा आदर राखण्याचा निर्णय घेतला.

क्रिकेट मंडळाकडून मला नेहमीच पूर्ण समर्थन आणि सहकार्य मिळालं. माझं काम करताना मला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं होतं, यासाठी मी त्यांचा आभारी आहे. असं हेसन म्हणाले.

काही महत्वाच्या घटना:
१९९९ उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त ’नॅशनल हेरिटेज गौरववृत्ती’ साठी निवड
१९७७ अ‍ॅपल कॉम्प्युटर्सने आपला ’अ‍ॅपल-II’ हा संगणक विकण्यास सुरूवात केली.
१९४० दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
१९४० दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
१९३५ अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ व बिल विल्सन यांनी ’अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस’ या संस्थेची स्थापना केली.
१७६८ माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादा पराभूत झाला.

जन्म :
१९५५ प्रकाश पदुकोण – ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला बॅडमिंटनपटू
१९३८ राहूल बजाज – उद्योगपती व राज्यसभा खासदार
१९२४ के. भालचंद्र – नेत्रशल्यविशारद (मृत्यू: ? ? १९८९)
१९०८ जनरल जयंतीनाथ चौधरी – भारताचे लष्करप्रमुख (१९६२ - १९६६), हैदराबादचे लष्करी प्रशासक (१९४८ - १९४९) व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्‌मविभूषण (मृत्यू: ६ एप्रिल १९८३)
१९०६ गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री (१९९१), गुजराती साहित्य परिषदेचे अध्यक्ष, गुजरातीतील मनोविश्लेषणात्मक कथेची सुरुवात करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. (मृत्यू: २० सप्टेंबर १९०९ - पोरबंदर, सौराष्ट्र, गुजरात)
१२१३ फख्रुद्दीन ’इराकी’ – पर्शियन तत्त्वज्ञ (मृत्यू: ? ? १२८९)

मृत्यू :
२००१ फुलवंताबाई झोडगे – सामाजिक कार्यकर्त्या, सावित्रीबाई फुले यांचा वारसा विसाव्या शतकातुन एकविसाव्या शतकापर्यंत नेण्याचे कार्य झोडगेअक्‍कांनी केले. (जन्म: ? ? ????)
१८३६ आंद्रे अ‍ॅम्पिअर – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २० जानेवारी १७७५)

Post a Comment

0 Comments