loading...

चालू घडामोडी 31 मे 2018

loading...
 गुगल प्रोग्रॅमिंगमध्ये अथर्व जोशी जगात प्रथम आला :
संगणक प्रणालीसाठी अत्यावश्‍यक 'सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज' हा अत्यंत आव्हानात्मक भाग असतो. याच प्रोग्रॅमिंगच्या स्पर्धेत पुण्याचा अथर्व जोशी (वय 17 वर्षे) जगात प्रथम आला आहे.

जागतिक पातळीवर गुगल-यू-ट्यूबकडून फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या स्पर्धेत भारतासह अमेरिका, इंग्लंड, चीन, जर्मनी, स्वित्झर्लंड अशा वीस देशांमधील आठ हजारांहून जास्त स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या अंतिम निकालामध्ये 'टॉप टेन' क्रमवारीत अथर्व सर्वप्रथम आला. सॅलसबरी पार्क येथील दीक्षा महाविद्यालयात अथर्व बारावीत शिकतो आहे.

'गुगल-यूट्यूबतर्फे 'सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिक लॅंग्वेज' अंतर्गत 'ग्राफिक एनकोडिंग-डीकोडिंग' ही जागतिक ऑनलाइन स्पर्धा वर्षातून एकदा होते. या परीक्षेसाठी किमान वय वर्षे 15 पूर्ण असावे लागते.

शिक्षणाची कोणतीही अट नसते. 'कोडशेफ' या संकेतस्थळावर ही परीक्षा देता येते. सोपी, मध्यम आणि कठीण अशा तीन पातळ्यांवरील पाच प्रश्‍नांची उत्तरे द्यावी लागतात.

अल्गोरिदम आणि डेटा स्ट्रक्‍चरवर आधारित वेगवान प्रोग्रॅमिंग करावे लागते. चार तासांच्या परीक्षेचा अंतिम निकाल मेलद्वारे अथर्व हा 'टॉप टेन' क्रमवारीत प्रथम आल्याचे गुगल-यूट्यूबकडून सांगण्यात आले.

रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग जिंकली :
स्पेनचा फुटबॉल संघ - रिअल माद्रिद - ने अंतिम सामन्यात इंग्लंडच्या लिव्हरपूल संघाचा पराभव करत UEFA चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकली आहे. किव्ह (युक्रेनची राजधानी) येथे हा सामना खेळला गेला.

रिअल माद्रिदचे हे चॅम्पियन्स लीगचे सलग तिसरे आणि पाच वर्षांतले चौथे विजेतेपद आहे.

UEFA चॅम्पियन्स लीग ही यूनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन (UEFA)कडून आयोजित केली जाणारी वार्षिक युरोप खंडातली क्लब फुटबॉल स्पर्धा आहे. 1955 साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळली गेली होती.

जपानची बॅडमिंटनपटू आकाने यामागुची हिने उबेर चषक जिंकला :

बँकॉकमध्ये खेळल्या गेलेल्या उबेर चषक स्पर्धेच्या महिला एकल गटात अंतिम सामन्यात जपानची बॅडमिंटनपटू आकाने यामागूची हिने थायलंडच्या रातचानोक इंतानोन हिचा पराभव करून जेतेपद मिळवले आहे.

जपानने 37 वर्षांनंतर उबर चषक मिळवला आहे. यापूर्वी जपानने 1981 साली हा किताब जिंकला होता.

उबर चषक ही एक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे, ज्यामध्ये विविध देशांचे राष्ट्रीय महिला बॅडमिंटन संघ भाग घेतात. ही द्वैवार्षिक स्पर्धा आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा 1956–1957 साली खेळली गेली.

जर्मनीत ‘2018 वैश्विक पवन शिखर परिषद’चे आयोजन :
जर्मनीच्या हॅम्बर्ग शहरामध्ये 25-28 सप्टेंबर 2018 या कालावधीत प्रथमच ‘वैश्विक पवन शिखर परिषद’ याचे आयोजन करण्यात आले आहे. या चार दिवसीय कार्यक्रमात भारत, चीन, अमेरिका, स्पेन आणि डेन्मार्कसह 100 देशांमधून प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.

पवन ऊर्जा उद्योग जगतातली ही जागतिक पातळीवरची सर्वात मोठी बैठक आहे. चीन, अमेरिका आणि जर्मनी या देशांनंतर प्रस्थापित 33 GW क्षमतेसह पवन ऊर्जा निर्मिती क्षमतेत भारत चौथ्या क्रमांकाचा देश आहे. 

कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : 
संपूर्णता सौर-ऊर्जा वापरणारे जगातले पहिले विमानतळ. केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला संपूर्णता सौर-ऊर्जा वापरणारे जगातले पहिले विमानतळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) कडून दिली गेली.

विमानतळाने 45 एकर परिसरात 15 मेगावॉट क्षमतेचा सौर प्रकल्प प्रस्थापित केलेला आहे. यापासून मिळालेल्या ऊर्जेनी विमानतळावर चालणार्‍या विद्युत उपकरणांची वीज गरज भागवली जात आहे. 

भारत-पाक सीमेवर आता शस्त्रसंधीचे उल्लंघन होणार नाही :
भारत-पाक सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झालेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये फोनवरुन तातडीची महत्वपूर्ण चर्चा झाली.

जम्मू-काश्मिरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी रेंजर्सकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झाले आहेत.त्याचबरोबर सीमाभागात राहणाऱ्या अनेक निरपराध नागरिकांचेही यात जीव गेले आहेत.

तसेच अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, पाकिस्तानच्या या नापाक कृत्यांना भारतीय जवानांनीही वेळोवेळी सडेतोड उत्तरे दिली आहेत. त्यामुळे घाबरलेल्या पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स (डीजीएमओ) यांनी भारताच्या डीजीएमओंशी 29 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता हॉटलाइनवरुन संपर्क साधला.

दरम्यान, दोन्ही पक्षांकडून झालेल्या चर्चेदरम्यान, सीमेवर दोन्ही बाजूंनी शस्त्रसंधीचे उल्लंघन थांबवण्यात येऊन सध्याचे तणावपूर्ण वातावरण बदलावे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याबाबत एकमत झाले. त्याचबरोबर दोन्ही लष्करी अधिकाऱ्यांदरम्यान 2003 मध्ये झालेल्या शस्त्रसंधीबाबत सहमती करार लागू करण्यावरही सहमती झाली.

तसेच जर कोणत्याही कारणास्तव सीमेवरील स्थिती बिघडली तरी सीमेवरील वातावरण खराब होऊ दिले जाणार नाही. त्यासाठी हॉटलाइनवरुन एकमेकांशी संपर्क करुन अथवा स्थानिक पातळीवर कमांडर स्तरावरील फ्लॅग मिटींगद्वारे त्यावर तोडगा काढण्यात यावा असे निश्चित झाले आहे.

महत्वाच्या घटना :

३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन.

१९१०: दक्षिण अफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाले.
१९३५: पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्‍वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिच्टर तीव्रतेच्या भूकंपात ५६,००० लोक ठार झाले.
१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी पाणबुड्यांनी सिडनी शहरावर हल्ल्यांचे सत्र सुरू केले.
१९५२: संगीत नाटक अकादमी ची स्थापना.
१९६१: दक्षिण अफ्रिका प्रजासत्ताक बनले.
१९७०: पेरू देशातील ७.९ तीव्रतेच्या भूकंपामुळे ७०,००० च्या दरम्यान मारले गेले आणि ५०,००० जण जखमी झाले.
१९९०: नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर.
१९९२: प्रख्यात गुजराती कवी हरिंद्र दवे यांना १९९१ चा कबीर सन्मान मध्य प्रदेश सरकारकडून जाहीर.

जन्म :
१६८३: सेल्सियस थर्मामीटरचे शोध लावणारे जीन पियरे क्रिस्टिन यांचे जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी १७५५)
१७२५: महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १७९५)
१९१०: बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २००१)
१९२१: आधुनिक गुजराथीतील प्रसिद्ध कवी सुरेश हरिप्रसाद जोशी यांचा जन्म.
१९२८: क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी२००१)
१९३०: अमेरिकन अभिनेता व दिग्दर्शक क्लिंट इस्टवूड यांचा जन्म.
१९३८: नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा जन्म.
१९६६: श्रीलंकेचा क्रिकेटपटू रोशन महानामा यांचा जन्म.


मृत्यू :
४५५: रोमन सम्राट पेट्रोनस मॅक्झिमस याला संतप्त जमावाने दगडांनी ठेचून ठार केले.
१८७४: प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १८२२ – मांजरे, पेडणे, गोवा)
१९१०: वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन. (जन्म: ३ फेब्रुवारी १८२१)
१९७३: कथालेखक दिवाकर कृष्ण केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९०२ – गुंटकल, अनंतपूर, आंध्र प्रदेश)
१९९४: बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९२१ – वाराणसी)
२००२: लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर१९२९)
२००३: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९१४)