loading...

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये ६६ पदक भारताने जिंकली

loading...
राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुसऱ्या क्रमांकावर ब्रिटन आणि तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारताने दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सर्वाधिक १०१ पदकं जिंकली होती. त्यानंतर मँचेस्टरमध्ये ६९ आणि आता ६६ पदकांची कमाई केली आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये एकूण ६६ पदकांची लयलुट करत भारताने शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २० कांस्यपदकं भारताने जिंकली. २०१४ ला ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने ६४ पदकांची कमाई केली होती. यंदा त्यापेक्षा उत्तम कामगिरी भारताने केली आहे.

हॉकी :
यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय हॉकी संघांच्या हाती निराशा आली. पुरुष आणि महिला या दोन्ही संघांना रिकाम्या हाताने परतावं लागलं. 

नेमबाजी :
भारताने नेमबाजीत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. नेमबाजीत भारताने ७ सुवर्णपदकांसह एकूण १६ पदकं जिंकली. तेजस्विनी सावंत, जीतू राय, हीना सिद्धू, मनू भाकर, अनीश भानवाला, मेहुली घोष अशा अनुभवी नेमबाजांनी भारताला पदकं जिंकून दिली.

बॅडमिंटन :
बॅडमिंटनमध्ये भारताने ६ पदकांची कमाई केली. महिला एकेरीत सायना नेहवालने सुवर्णपदक जिंकले. पुरुष गटात किदाम्बी श्रीकांतने रौप्य पदक जिंकले. तसंच मिक्स् टीम इव्हेंटमध्ये भारताने सुवर्णपदकाची कमाई केली.

टेबल टेनिस :
टेबल टेनिसमध्ये महिला आणि पुरुष संघाने सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला. याशिवाय महिला एकेरीत मनिका बत्राने सुवर्णपदक जिंकले. पुरुष दुहेरीत आणि महिला दुहेरीत भारताने रौप्य पदकाची कमाई केली.

अॅथलेटिक्स :
अॅथलेटिक्समध्ये भारताने ३ पदकं जिंकली. नीरज चोपडाने भालाफेकमध्ये भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून दिले. तर सीमा पुनियाने थाळीफेकमध्ये रौप्य आणि नवदीप ढिल्लोने कांस्यपदक जिंकले.
वेटलिफ्टींग :
वेटलिफ्टींगमध्ये भारताने ९ पदकं जिंकली. यात ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्यपदकांचा समावेश आहे. मीराबाई चानू, संजीता चानू आणि पूनम यादव यांनी भारतासाठी सुवर्णपदकं जिंकली.

कुस्ती :
कुस्तीत भारतीय पैलवानांनी चमकदार कामगिरी केली. कुस्तीत भारताने ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकं जिंकली. राहुल आवारे, विनेश फोगट, साक्षी मलिक, सुमित या पैलवानांनी मैदान मारलं.