loading...

मराठी व्याकरण अलंकार

loading...
भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला अलंकार असे म्हणतात.
अलंकाराचे दोन प्रकार आहेत:
  • शब्दालंकार
  • अर्थालंकार

१)शब्दालंकार :यात केवळ शाब्दिक चमत्कृती साधली जाते.

शब्दालान्काराचे प्रकार:
१) अनुप्रास :
 कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन, त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होतो तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. अ) आज गोकुळात रंग खेळतो हरी l राधिके जर जपून जा तुझ्या घरी l
ब)बालिश बहु बायकात बडबडला.
क)गडद निळे गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनु चपळ चरण अनिलगण निघाले.

२) यमक:
वेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन, जे सौंदर्य प्राप्त होते त्यास यमक असे म्हणतात.
अ)मन सज्जना भक्तीपंथेची जावे l
 तरी श्रीहरी पाविजे ते स्वभावे l
ब)सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो l
कलंक मातीचा झडो, विषय सर्वथा नावडो l३) श्लेष अलंकार :
या अलंकारात एकाच शब्द दोन अर्थाने वापरला जातो.
अ)मला एस.टी. लागते. (गरज असणे/त्रास होणे)
ब)कुस्कुरू नका हि सुमने ll
जरी वास नसे तिळ यास,
तरी तुम्हास अर्पिले सु-मने ll
 क)शंकरास पुजिले सुमने.
ड)श्रीकृष्ण नवरा मी नवरी l
   शिशुपाल नवरा मी न-वरी l
इ)हे मेघ, तू सर्वांना जीवन देतोस.(आयुष्य /पाणी)


अर्थालंकाराचे प्रकार :

यात वाक्यातील अर्थामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते.

१) उपमा :
दोन वस्तू मधील साधर्म्य दाखविण्यासाठी सम, समान, सारखा, प्रमाणे, परी, परिस सारख्या शब्दांचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो.

अ)सवल रंग तुझा पावसाळी नभापरी.
ब)असेल तेथे वाहत सुंदर दुधारखी नदी.
क)मुंबई ची घरे मात्र लहान कबुतराच्या खुराड्यासारखी.

२) उत्प्रेक्षा :
 उपमेय हे जणू उपमानच आहे हे दर्शवण्यासाठी जणू, जणुकाय,गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो.

अ)हा आंबा जणू साखरच!
ब)त्याचे अक्षर जणू काय मोतीच!
क)ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू!
ड)आकाशातील चांदण्या जणू फुलांची पखरण!

३) आपन्हुती :
याचा अर्थ लपविणे असा होतो.यात उपमेय लपून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते.


अ)हा आंबा नाही, ही साखरच आहे.(उपमेय-मूळ वस्तू, उपमान-उपमा देण्यासाठी वापरलेली वस्तू.)
ब)हे हृदय नसे, परी स्थंडिल धगधगते l
क)ओठ कशाचे? देठची फुलले पारिजातकाचे l

४) अनन्वय अलंकार :
ज्या वेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही, म्हणून ती उपमेयाबरोबरच केली जाते तेव्हा अनन्वय अलंकार होतो. एखाद्या घटकाची तुलना त्याच्या स्वत बरोबरच करणे.

अ)आहे ताजमहाल एक जगती तोच त्याच्या परी l
ब)झाले बहु, होतील बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा l

५) रूपक :
जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो.
अ)देह देवाचे मंदिल l आत आत्मा परमेश्वर
ब)वाघिणीचे दुध प्याला,वाघबच्चे फाकडे ll 


६) अतिशयोक्ती :
एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगणे, याला अतिशयोक्ती असे म्हणतात.

अ)जो अंबरी उफळता खुर लागलाहे 
तो चंद्रमा निज तनुवरि डाग लाहे.

ब)ती रडली समुद्राच्या समुद्र.

क)तुझे पाय असे भासतात, जणू हवेवर नाचतात.

ड)दमडीचा तेल आणलं, सासुबीच न्हाण झालं
मामांजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली
उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला.

७) दृष्टांत :
एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला दिल्यास दृष्टांत अलंकार होतो.
अ) लहानपण देगा देवा l मुंगी साखरेचा रवा l
ऐरावत रत्न थोर l त्यासी अंकुशाचा मार l

ब)निवडी वेगळे क्षीर आणि पाणी l राजहंस दोन्ही वेगळाली l
  तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे l येरागबाळाचे काम नव्हे l

क)न कळता पद अग्नीवर पडे l न करी दाह असे न कधी घडे l
 अजित नाम वदो भलत्या मिसे l सकळ पातक भस्म करितसे ll


८) विरोधाभास :
वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा विरोधाभास अलंकार होतो.
अ) जरी आंधळी मी तुला पाहते.

ब) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदु ऐसे.