loading...

Solapur University सोलापूर विद्यापीठ

loading...
स्थापना : 

"विद्यया संपन्नता" हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी, सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या सोलापूर विद्यापीठाची स्थापना 22 जुलै, 2004 रोजी झाली, व प्रत्यक्ष कामकाज दि.01 ऑगस्ट 2004 पासून सुरू झाले. दुष्काळी व ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करुन, उच्च शिक्षणाची संधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ करीत आहे.

1 ऑगस्ट, 2014 रोजी दशकपूर्ती साजरी करुन अकराव्या वर्षात पदार्पण केलेल्या या विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगाची 2 (फ) आणि 12 (ब) ची मान्यता मिळविली. आता हे विद्यापीठ 'नॅक' च्या मानांकनासाठी सज्ज झाले असून ऑगस्ट/सप्टेंबर, 2015 मध्ये 'नॅक' ची समिती या विद्यापीठास भेट देईल, असे अपेक्षित आहे. देशात उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढवायचे असेल तर प्रत्येक जिल्ह्यात एक विद्यापीठ स्थापन होणे गरजेचे आहे, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे. त्या दृष्टीने सोलापूर विद्यापीठाचे उदाहरण पथदर्शक ठरु शकेल.

वाटचाल : 


सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली तेव्हा विद्यापीठाकडे 35.5 एकर जागा उपलब्ध होती. त्यानंतर अधिकची 482 एकर नवीन जागा प्राप्त झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता झाली आहे, आणि याबाबत विद्यापीठाचा मास्टर प्लॅन तयार होऊन हे विद्यापीठ विकासाच्या वाटेवर वाटचाल करीत आहे.

कला, क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी नावलौकिक प्राप्त करुन, देशस्तरावरची अनेक पारितोषिके प्राप्त केली आहेत. शैक्षणिक क्षेत्रात तसेच संशोधनाच्या क्षेत्रातही विद्यापीठाची कामगिरी गौरवास्पद आहे.

परीक्षांचे निकाल वेळेत लावण्याच्या बाबतीत तर सोलापूर विद्यापीठाने प्रस्थापित विद्यापीठांना मागे टाकत अभिनंदनीय कामगिरी केली आहे. ‘क्लोज सर्किट कॅमेरा’ यंत्रणेचा योग्य वापर व 90 टक्के निकाल 30 दिवसांत लावण्याची कामगिरी करणाऱ्या सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाज पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इतर विद्यापीठांच्या अधिकार पथकांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन माहिती घेतली आहे. परीक्षा विभागाने DEPDS प्रणालीद्वारे ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठविण्याचे गौरवास्पद कार्य केले आहे.

अभ्यासक्रम :

सोलापूर विद्यापीठाने 2009 सालापासून शैक्षणिक संकुल प्रणालीचा स्वीकार केला. सध्या 05 शैक्षणिक संकुलात व दोन विद्यापीठ विभागात विद्यार्थ्यांसाठी 19 अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली आहे. या शैक्षणिक संकुलांची नावे व उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत.
अ.क्र.
संकुलाचे नाव
अभ्यासक्रम
01
पदार्थ विज्ञान संकुल
फीजिक्स (अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स)
इलेक्ट्रॉनिक्स (कम्युनिकेशन सायन्स)
फीजिक्स सॉलिड स्टेट फिजिक्स
02
रसायनशास्त्र संकुल
पॉलिमर केमिस्ट्री
ऑरगॅनिक केमिस्ट्री
इंडस्ट्रीयल केमिस्ट्री
03
भूशास्त्र संकुल
अप्लाईड जिओलॉजी
पर्यावरण शास्त्र
जिओ इन्फोरमॅटिक्स
04
संगणकशास्त्र संकुल
मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स
कॉम्प्युटर सायन्स
मॅथेमॅटिक्स
स्टॅटिस्टिक्स
05
सामाजिक शास्त्रे संकुल
पुरातत्व शास्त्र
रुरल डेव्हलपमेंट
अप्लाईड इकॉनॉमिक्स
जर्नालिझम व मास कम्युनिकेशन
06
शिक्षणशास्त्र विभाग
एम. एड.
07
वाणिज्य व व्यवस्थापन विभाग
एम. कॉम
सोलापूर विद्यापीठाशी 119 महाविद्यालये संलग्न असून, त्यात एकूण 138 विषय शिकविले जातात. विद्यापीठ व महाविद्यालयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 64,863 इतकी आहे.

विद्यापीठाची गुणवैशिष्ट्ये:

सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रबिंदू मानून सातत्याने कार्य केले आहे. परिक्षेत चांगले यश मिळविण्याऱ्या गुणवंत पाल्यांसाठी एकंदर 19 सुवर्णपदके दरवर्षी प्रदान केली जातात. या सुवर्णपदाकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांसाठी 'कमवा आणि शिका' योजना सुरु असून त्यातून गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते.
विद्यापीठात विद्यार्थी वसतिगृह, विद्यार्थिनी वसतिगृह, अतिथीगृह, उपहारगृह, आरोग्य केंद्र व सुसज्ज ग्रंथालय या सुविधा आहेत. नवीन विद्यार्थिनी वसतिगृहासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 01 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी दरवर्षी विद्यापीठ परिसरात विविध उद्योग समुहांच्या सहकार्याने कॅम्पस इंटरव्हूवचे आयोजन केले जाते.
संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी विद्यापीठ वर्षातून दोनदा Ph.D. प्रवेश परीक्षा घेते. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात संशोधन करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात विद्यापीठाने चांगली कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी सर्व संकुलात सोलापूर विद्यापीठ विभागीय संशोधन स्कॉलरशीप, संगणक प्रयोगशाळा तसेच ग्रंथालयात इंटरनेट व ई-जर्नल्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
गरीब आणि होतकरु विद्यार्थ्यांना घरी अभ्यास करण्यासाठी आणि अभ्यास संपल्यानंतर त्यांच्या संग्रही असणे आवश्यक असलेली पुस्तके देण्याचा उपक्रम विद्यापीठाने हाती घेतला असून प्रती वर्षी 40 विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. 2500/- ची पुस्तके वाटप करण्यात येतात.

सामाजिक बांधिलकी :

केवळ अध्यापक व परीक्षा एवढेच विद्यापीठाचे कार्य नसते याची जाणीव ठेऊन विद्यापीठाने सामाजिक जाणिवेतून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. डॉ. अनंत ॲण्ड लता लाभसेटवार व्याख्यानमाला तसेच कॉ. प्रभाकर यादव व्याख्यानमाला याद्वारे महत्त्वाच्या सामाजिक व आर्थिक विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करुन समाज प्रबोधनाचे कार्य विद्यापीठ करते. याशिवाय विज्ञान दिन व पर्यावरण यात्रा यासारख्या उपक्रमातून समाजातील विविध घटकांपर्यत सामाजिक कार्य विद्यापीठ करीत असते.
एकंदर विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्याने या विद्यापीठाने आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्यात यश प्राप्त केले आहे.

संपर्क :

या विद्यापीठाच्या अधिक माहितीसाठी su.digitaluniversity.ac या वेबसाईटला भेट द्यावी. विद्यापीठाचा दूरध्वनी क्रमांक 0217-2744771/2474772 आहे.