loading...

भारतातील आणीबाणी Emergency in India

देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे, असा दावा करत भारतात 40 वर्षांपूर्वी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आज आणीबाणीच्या अंधारयुगाला 40 वर्षे पूर्ण होत आहेत... त्यानिमित्ताने आणीबाणीचा हा थोडक्यात आढावा :
  • आणीबाणीची घोषणा
आजपासून बरोबर 40 वर्षांपूर्वी 25 जूनच्या मध्यरात्रीनंतर आणि 26 जूनच्या पहाटे पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. 26 जूनच्या सकाळी आठ वाजता देशाला उद्देशून आकाशवाणीवरून भाषण करताना त्या म्हणाल्या की, देशात अराजकसदृश स्थिती निर्माण झाली आहे. देशाचे स्थैर्य आणि सार्वभौमत्व धोक्यात आणले गेले आहे. लोकांची माथी भडकावली जात आहेत आणि कायदा, सुव्यवस्था व शिस्त प्रस्थापित करण्यासाठी सरकारला काही कठोर पावले उचलणे भाग पडले आहे. ते कठोर पाऊल म्हणजेच आणीबाणी.
26 जून 1975 रोजी सकाळी 8 वाजता इंदिरा गांधींनी आकाशवाणीवरुन देशवासीयांना उद्देशून म्हटलं :
"भाईयों और बहनों, राष्ट्रपती जी ने आपातकाल की घोषणा की है.. इससे आतंकित होने का कोई कारण नहीं"- इंदिरा गांधी

"The President has proclaimed emergency. This is nothing to Panik about." – Indira Gandhi
  • आणि आणीबाणी जाहीर झाली!
भारताला इंग्रजांच्या जाचातून 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. स्वातंत्र्यानंतरही भारतीय समाजात आणि राजकारणात तत्वांशी बांधील असलेली माणसं कार्यरत होती. मात्र, काळ हळूहळू बदलत गेला. पंडीत नेहरु, लाल बहादुर शास्त्री यांनी देशाची घडी व्यवस्थित बसवण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. लालबहाद्दूर शास्त्रींच्या अकाली निधनानंतर इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. प्रतिगामी विचारांच्या जोखडाखाली असलेल्या आपल्या देशासाठी हा एक मैलाचा दगड होता.
1969 मधील विजयानंतर इंदिरा गांधींची जनमानसातील प्रतिमा उंचावली होती. 1971 मध्ये त्यांनी ज्या तडफेने आणि मुत्सद्दीपणे बांगलादेशाची निर्मिती करून पाकिस्तानला शरणागती पत्करायला लावली. त्यानंतर दस्तुरखुद्द अटलबिहारी वाजपेयींनीही इंदिरा गांधींना ‘दुर्गामाता’ असे संबोधले होते. मात्र, त्यानंतर तीनच वर्षात इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली.
  • आणीबाणीबाबत काँग्रेसचा दावा
जयप्रकाश नारायण यांनी 1973 मध्ये देशात भ्रष्टाचारविरोधी चळवळ उभारली होती. याच सुमारास गुजरातमधील विद्यार्थ्यांनी तत्कालीन चिमणभाई पटेल सरकारविरोधात भ्रष्टाचारविरोधी मोहीम उघडल. पण यादरम्यान आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि गुजरातमधील हिंसक घटनांत त्यावेळी 130 जण ठार आणि 300 लोक जखमी झाले होते. तत्पूर्वी 1970 चा दुष्काळ, बांगला निर्वासितांचा बोजा आणि पाकिस्तानशी 1971मध्ये झालेल्या युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली होती. देशात धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पेट्रोलचे भाव वाढले होते. रेल्वे वर्कर्स युनियनचे अध्यक्ष जॉर्ज फर्नांडिस यांनी अशा नाजूक क्षणी रेल्वे कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप पुकारण्याचा मनसुबा जाहीर केला होता. सरकारने हा संप मोडून काढला. पण येथूनच देशात बेशिस्तीने थैमान घालण्यास सुरुवात केली. शिवाय अमेरिकेसारख्या देशाकडून वारंवार होत असलेला दबाव, या अनेक कारणांमुळे आणीबाणी जाहीर करावी लागली असा काँग्रेसचा तेव्हाही दावा होता आणि आजही आहे. द्वेषमूलक देशविघातक राजकारणाची परिणती म्हणजे तत्कालीन आणीबाणी असे काँग्रेस पक्षाकडून कायम सांगण्यात येते.
  • आणीबाणीदरम्यान सकारात्मक बदल काय झाला?
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 च्या मध्यरात्री देशात जी आणीबाणी लागू केली होती, त्याबाबत जगभरातील बुद्धिवाद्यांनी त्यांना कधीच माफ केले नाही. आणीबाणीमुळे नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आली. वृत्तपत्रस्वातंत्र्यावर आणि सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली. मात्र, याबरोबरच एक मान्य करायलाच हवं की, आणीबाणीमुळे देशात एक शिस्त आली. भ्रष्टाचाराला आळा बसला होता. महिलांवरील अत्याचार कमी झाले होते. जातीय दंगे थांबले हाते. वस्तूंच्या किमती खाली आल्या होत्या. कार्यालयीन कामांना गती आली होती. स्मगलर्स, गुंड तुरुंगात गेले होते. आर.एस.एस., जमाते इस्लामी, आनंदमार्गी, नक्षलवादी यांसारख्या धर्मांध नि दहशतखोर संघटनांवर बंदी आली होती.
  • आणीबाणीच्या काळात संजय गांधींचा हैदोस
आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी सत्तेचा प्रचंड गैरवापर करीत देशभर हैदोस घातला होता. सक्तीची नसबंदी, दिल्लीतल्या तुर्कमान गेट परिसरातल्या अल्पसंख्याकांच्या झोपड्या पाडून टाकणे, वृत्तपत्रावरील प्रसिध्दीपूर्व नियंत्रणाचा अतिरेक हे सारे संजय गांधी आणि त्यांच्या टोळक्यानेच घडवले होते. आणीबाणीच्या काळात संजय गांधी हे सत्ताबाह्य केंद्र झाले होते.