loading...

वजाबाकी (Deduction)


वजाबाकी म्हणजे कमी करणे किंवा घालविणे.
आपण उलट क्रमाने संख्या म्हणत असताना एक ही संख्या वजा करीत संख्या म्हणतो. शंभर ते एक या संख्या उलट क्रमाने म्हणता येणे ही उत्तम बौध्दिक कसरत आहे. वेगाने उलट क्रमाने संख्या म्हणताना संख्यांची स्थानिक किंमत लक्षात ठेवणे ही क्रिया आपोआप घडत असते.
दिलेल्या संख्येतून एकापेक्षा मोठी संख्या वजा करतानाही एकअंकी बेरजेचा तक्ताच आपल्याला उपयोगी पडणार आहे. उदा. 8-5 ही वजाबाकी करताना 'पाच आणि तीन आठ' हे कोष्टक आपण मनातल्या मनात म्हणणार आहोत. हे लक्षात येण्यासाठी 8-5 म्हणजे पाचात 'किती' मिळविले की आठ येतील हा प्रश्न आपल्या मनात आपोआप तयार होणार आहे.
वजाबाकी करतानाही 'हातचा' मागण्याचा प्रकार आपण करणार नाही. उदा. 14-8 ही वजाबाकी करताना आपण आठात किती मिळविले की चौदा येतील हा प्रश्न मनात आणून 'आठ आणि सहा चौदा' हे उत्तर लगेच तयार करणार आहोत.
45-19 ही वजाबाकी करण्याचा प्रयत्न करु. इथेही 'एकोणीसात किती मिळविले की पंचेचाळीस येतील' याच प्रश्नापासून आपण आपला प्रवास सुरु करु. एकोणीसानंतरचा पहिला थांबा वीस घेऊ. एकोणीसात एक मिळविला की वीस येतात. हा 'एक' लक्षात ठेऊ. वीसात पंचवीस मिळविले की पंचेचाळीस येतील हे एकदम काढू किंवा वीस आणि वीस चाळीस आणि चाळीस आणि पाच पंचेचाळीस असे थांबे घेत जाऊ.
45-19=45-20+1=25+1=26 किंवा 45-19=45-20+1=20+5+1=26